| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील वावंजे ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रशासकीय अधिकारी दत्तू पांडुरंग हिंदोळा यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकास अधिकारी संतोष धर्मा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नैना प्रकल्पाला विरोध हा ठराव घेण्यात आला आणि जलजीवन मिशन योजना लवकरात लवकर कशी चालू होईल यासाठी प्रयत्न करणे या विषयावर विशेष चर्चा करण्यात आली.
26 जानेवारी 2025 रोजी तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. 10) सकाळी समाज मंदिर वावंजे येथे घेण्यात आली. या सभेत अनेक विषयांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महत्त्वाचे म्हणजे, या ग्रामसभेत नैनाविरुद्ध ग्रामस्थांनी बहुमताने ठराव मंजूर केला आणि नैना प्रशासन विरुद्ध प्रचंड आक्रोश जाहीर केला. यावेळी आरपारची लढाई उभी करून नैनाला गावातील जमिनीवर पाय ठेवू देणार नाही, त्यासाठी रक्त सांडले तरी मागे हटणार नाही, असा निर्धार वावंजे ग्रामस्थांनी केला. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन योजना लवकरात लवकर कशी कार्यान्वित होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावे आणि अंतर्गत पाणीपुरवठा करणे, नवीन घरांना नळजोडणी करून देणे या महत्त्वाच्या विषयासह असे अनेक विषय घेण्यात येऊन त्यातून मार्ग काढण्यात आले. त्यासाठी आम्ही ग्रामस्थ कुठे जावे लागेल, कोणाला भेटावे लागेल त्यासाठी तयार आहोत. मात्र, त्यासाठी योजना राबविण्यासाठी विलंब लावू नका, असे सुचविण्यात आले. ही सभा हेमंत पाटील व अॅड. मनीष पाटील यांच्या सहाय्याने पार पडली.