कचेरी रस्त्यात पाणी तुंबल्याने नागरिकांचे हाल

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा समजला जाणारा कचेरी रोड पावसाळा सुरू होताच पुन्हा एकदा जलमय झाला असून, तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या संतापाला उधाण आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असतानाही आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि वाहनचालक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कचेरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे बांधण्यात आली असली तरी त्या गटारांतील पाणी पुढे वाहून जाण्यासाठी कोणताही निचऱ्याचा मार्ग उपलब्ध नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून राहते. परिणामी कचेरी रोडपासून कोकण रेल्वे पुलापर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते आणि संपूर्ण परिसर जलमय होतो. रस्त्यावर साचलेले घाण, चिखल आणि दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाक मुठीत धरून या रस्त्यावरून जावे लागते. महिलांना पाण्यातून वाट काढताना अपघाताची भीती सतावत असते, तर ज्येष्ठ नागरिकांनाही जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. पाण्याखाली खड्डे लपल्याने अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक आस्थापना, हॉटेल्स, निवासी इमारती तसेच प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची शासकीय निवासस्थाने आहेत. एवढ्या महत्त्वाच्या परिसरात दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होत असतानाही प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Exit mobile version