। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव शहरातील मुख्य रस्त्यावर फिरणार्या भटक्या श्वानांंची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. माणगाव नगर पंचायत हद्दीतील मोर्बा, मोर्बा रोड, खांदाड, भादाव, उतेखोल, साईनगर, दत्तनगर या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांची वाढ झाली असून रात्री कामावरून येणार्या लोकांच्या अंगावर हे श्वान धावून जात आहेत. तसेच रात्रभर जोर जोरात भुंकत असतात. यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
ही भटकी कुत्री अपघातांना देखील कारणीभूत ठरत असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा करूनही प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. मोर्बारोड परिसरात असलेल्या कचराकुंड्यांवर, हॉटेल बाहेरील कचराकुंड्यांवर तसेच हॉटेलमधील शिळ्या पदार्थांवर या कुत्र्यांची गुजराण होत असल्याने याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगर पंचायत हद्दीतील मोर्बारोड, खांदाड, दत्तनगर, कचेरी रोड, शहरातील सर्वच मुख्ये रस्ते आदी भागात या कुत्र्यांचे वास्तव्य आहे. एकीकडे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा चालू असतानाच या मोकाट भटक्या कुत्र्यांमुळे माणगावकर नागरिक हैराण झाले आहेत.
माणगांव शहरातील बाजारपेठ निजामपूर रोड, मोर्बारोड, कचेरी रोड अन्य सार्वजनिक ठिकाणी भटक्या मोकाट कुत्र्यांनी उपद्रव माजवला आहे. ही कुत्री दुचाकीस्वार व चारचाकी वाहन चालक यांचा पाठलाग करतात त्यामुळे माणगांवमध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आहे,तरी माणगांव नगरपंचायत प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.
– सहदेव खराडे,
ग्रामस्थ-उतेखलवाडी, माणगांव