डॉ. भरत बास्टेवाड यांची माहिती; 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी अभियान
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोधमोहीम अभियान 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे. कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी 1 हजार 662 पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील घरोघरी सर्वेक्षण करुन कुष्ठरुग्ण शोधमोहीम काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे.
शोधमोहिमेदरम्यान नागरिकांचे कुष्ठरोग आजाराबाबतचे गैरसमज दूर करुन ते बरे होऊ शकतात, असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करुन कुष्ठरुग्णांना तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली.
मोहिमेदरम्यान आशा स्वयंसेविका, स्वंयसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेणार असून, रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.14) जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना डॉ. भरत बास्टेवाड यांनी संबंधितांना दिल्या.
या मोहिमेंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करण्याचे उष्ट ठेवण्यात आले आहे. मंगळवारी पार पडलेल्या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, सहायक संचालक कृष्ठरोग डॉ. प्राची नेहुलकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांच्यासह जिल्हा समन्वय समिती सदस्य उपस्थित होते.
1413 लोकांमागे एक पथक कार्यरत
कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 23 लाख 50 हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण गृहभेटी देऊन करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 662 पथके तयार करण्यात आली आहेत. म्हणजेच 1413 लोकांमागे एक पथक तैनात करण्यात येणार आहे. 332 पर्यवेक्षकांच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोगसंदर्भात संपर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात 479 सक्रीय कृष्ठरुग्ण
डिसेंबर अखेर रायगड जिल्ह्यात 479 कुष्ठरुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यात 23 कुष्ठरुग्ण असून, कर्जत 76, खालापूर 45, महाड 31, माणगाव 33, म्हसळा 10, मुरुड 7, पनवेल ग्रामीण 48, पनवेल शहर 55, पेण 44, पोलादपूर 8, रोहा 38, श्रीवर्धन 8, सुधागड 32, तळा 5, उरणमध्ये 16 कुष्ठरुग्ण आहेत.