| नेरळ । वार्ताहर ।
अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील कलिंगड शेती उध्वस्त झाली आहे. तालुक्यातील चांदई आणि वदप येथे करण्यात आलेल्या कलिंगड शेती केली होती. दरवर्षी मार्च ते मे या कालावधीत या दोन्ही शेतकर्यांच्या शेतात कलिंगडाचे पीक बहरत असते. मात्र मार्च महिन्यात आलेल्या अवकाळी आल्याने कलिंगडाची शेती वाया गेली असून दोन्ही शेतकर्यांचे हजारोंचे नुकसान झाले आहे.यातील एका शेतकर्याने कलिंगडाचे शेतात फळे तशीच टाकून दिली आहेत तर एका शेतकर्याने आपल्या कलिंगडाच्या शेतात बकर्या सोडून दिल्या आहेत.
चांदई गावातील सुनील रसाळ हे प्रगतशील शेतकरी समजले जातात. गेली अनेक वर्षे सेंद्रिय शेतीमधून उन्हाळ्यात कलिंगडाचे तर पावसाळ्यात भाताची शेती करीत असतात. सातत्याने सेंद्रिय खते वापरून कलिंगड शेती करणारे रसाळ यांना आपल्या दोन एकर कलिंगडाच्या शेतीमधून किमान 30-40 टन कलिंगड पिकतात. सेंद्रिय पदधतीने शेती केली जात असलेल्या त्यांच्या शेतातील शुगर किंग आणि आईस बॉक्स या जातीच्या कलिंगड यांना बाजारात मोठा भाव मिळतो. साधारण मार्च महिन्यात त्यांच्या शेतातील कलिंगड विक्रीसाठी उपलब्ध होत असतात आणि त्या कलिंगड यांचे शेवटचे फळ मे अखेर म्हणजे अख्खा उन्हाळा त्यांच्या शेतातून कलिंगडाचे पीक उपलब्ध होत असते. सेंद्रिय खते वापरून कलिंगड पिकविली असल्याने आपल्या शेताबहेर स्टॉल लावून देखील सर्व माल आवश्यक किमतीत विकला जात असतो.
चांदई गावातील सुनील रसाळ यांच्या शेताच्या काही अंतरावर त्याच गावातील माधव कोळंबे हे दुसरे एक प्रगतशील शेतकरी यांनी यावर्षी कलिंगडाची शेती केली होती. मालचींग पेपर आणि ठिबक सिंचन यांचा वापर करुन आयशा जातीचे कलिंगड पिकाची लागवड केली होती. त्यांच्या शेतातील 27 गुंठे क्षेत्रातून साधारण चार टन माल विकून चांगला नफा मिळवत असताना 21 मार्च रोजी सकाळी अडीच तास पाऊस कोसळत होता. त्या अवकाळी पावसामुळे माधव कोळंबे यांच्या शेतातील कलिंगडाची फळे यांना बुरशी आली आणि त्यामुळे माधव कोळंबे यांना कलिंगडाची फळे शेतात तशीच टाकून देण्याची वेळ आली.
शासनाची मदत नाही
अवकाळी पावसामुळे भाजीपाला शेती आणि फळबागा यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र त्या बाबत शासनाचे एकही प्रतिनिधी हे उन्हाळ्यात शेती करणार्या शेतकर्याच्या शेतात पोहचले नाहीत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची शक्यता कमी असल्याने सुनील रसाळ, माधव कोळंबे यांच्या सारखे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.