कुंडलिकेच्या काठी कलिंगडाचा मळा

मगर कुटुंबियांच्या मेहनतीचे फळ
| राकेश लोहार | चौल |
पूर्वी कलिंगड उन्हाळी हंगामातच प्रामुख्याने दिसून यायचे. परंतु, आता अन्य हंगामातही हे फळ बाजारात दिसू लागले आहे. विविध संकरीत वाणांच्या माध्यमातून आज या पिकाचे भरघोस पीक शेतकरी घेत आहेत. कलिंगडाची साधारणपणे जानेवारी महिन्यात लागवड केली जाते. मात्र, रोह्याच्या प्रवीण अनंत मगर यांनी ऑक्टोबरमध्येच गोल्डन जातीच्या कलिंगडाची लागवड केली. त्यामुळे आज त्यांच्या शेतीतील फळे काढणीयोग्य झाली असून, मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. चवीला गोड आणि उत्तम दर्जा असलेल्या कलिंगडांना महाराष्ट्रासह परदेशातही मागणी वाढली आहे. बाजारातील मागणी वाढलेली अन् भरघोस आलेले उत्पादन याची सांगड चांगली जमल्याने रोहा येथील प्रवीण मगर यांनी कुंडलिका नदीच्या काठावर जाणू कलिंगडांचा मळा फुलविला आहे. रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील धाटाव-वाशी गावातील प्रवीण अनंत मगर या 30 वर्षीय तरुण शेतकर्‍याने मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर करुन 35 एकर जागेत कलिंगडाची सेंद्रिय पद्धतीने शेती केली आहे. एकीकडे लहरी हवामानाचा, निसर्गाच्या रुद्रावताराचा फटका शेतकर्‍यांना बसत असताना, प्रवीण मगर यांनी निसर्गापुढे हार न मानता प्रयोगातून सर्व शेतकर्‍यांसमोर आशादायी चित्र उभे केले आहे.


रायगड जिल्हा ‘भाताचे कोठार’ म्हणून प्रसिद्ध असलेला जिल्हा. परंतु, वाढते औद्योगिकीकरण, लहरी हवामानाचा बसत असलेला फटका यामुळे अनेक शेतकर्‍यांनी शेतजमिनी ओसाड ठेवल्या आहेत. त्यामुळे ‘भाताचे कोठार’ ही ओळख हळूहळू पुसली जाण्याच्या मार्गावर आहे. सगळेचजण शेतीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असताना, रोह्यातील एका शेतकर्‍याने भाडपट्ट्याने शेती घेऊन ती कसायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी सेंद्रीय तंत्राचा अवलंब केला आहे. जीवांमृत, दशपर्णी अर्क, यासारख्या गोष्टींचा त्यांनी वापर केला. रासायनिक खतांपेक्षा जैविक खतांचा जास्त वापर केल्यामुळे त्यांचे पीक जोरदार आले असून, बाजारात मागणीही भरपूर आहे. रोहा म्हणजे विविध औद्योगिक कंपन्यांमुळे नावारुपाला आलेला तालुका. परंतु, धाटाव-वाशी गावातील मगर कुटुंबामुळे आता हा परिसर कलिंगडासाठीदेखील प्रसिद्ध होत आहे. वडील अनंग मगर यांनी सुरु केलेल्या शेतीचा वसा संपूर्ण मगर कुटुंबाने जपला असून, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. प्रवीणसह अन्य दोन भाऊ अरविंद, परेश वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपापले व्यवसाय सांभाळून आनंदाने शेती करीत आहेत. श्री. मगर यांनी शेतीत केलेल्या प्रयोगांमुळे त्यांना अनेक पारितोषिके देऊन गौरवण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर मगर कुटुंबाच्या या कलिंगड शेतीला भेट देत आहेत.


पारंपरिक पद्धतीने शेती करत होतोच; पण सध्याच्या काळात सेंद्रिय उत्पादनांना असणारी मागणी, पाण्याची कमतरता या बाबी लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करुन त्यानुसार कलिंगडाचे पीक घेण्याचे ठरवले. गोल्डन जातीच्या कलिंगडाच्या बियांपासून रोपे तयार करून त्यांची लागवड करण्यात आली. निंबोळी अर्क, जीवांमृत यांचाही वापर केला. लागवड करताना जमिनीवर मल्चिंग पेपरच्या साह्याने आच्छादन केले. त्यामुळे तण वाढत नाही आणि पाण्याचे बाष्पीभवनही टाळता येते. पाणीबचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला. या लागवडीसाठी सुमारे 10 ते 12 लाख रुपये खर्च आला असून, खर्च वजा जाता 15-20 लाखांपर्यंतचा नफा अपेक्षित असल्याचे श्री. मगर यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले.


शेतीमध्ये प्रयोग होण्याची गरज
‘सेंद्रिय शेती कशी करायची, त्याचे फायदे काय, पीक पद्धत कशी असावी याबाबत आम्ही मार्गदर्शन करतो. शक्य तेवढी सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. शेती योग्य पद्धतीने शेती केली तर नक्कीच लाभदायी होते, यावर माझा ठाम विश्‍वास आहे. हेच मी सर्वांना सांगतो, असेही प्रवीण मगर यांनी आवर्जून नमूद केले. राज्यात सध्या अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळून निघत आहेत. अशा परिस्थितीत कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतीकरी आत्महत्या करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मगर कुटुंबाचे उदाहरण शेतकर्‍यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. सेंद्रिय पद्धत आणि ठिबक सिंचन यांच्या वापराद्वारे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार्‍या शेतीमध्ये असे प्रयोग ठिकठिकाणी होण्याची गरज आहे.


व्यवस्थापन महत्त्वाचे
पीक कोणत्याही हंगामतील असो, त्याचे पाणी आणि खतांचे व्यवस्थापन योग्य करणे महत्त्वाचे असते. गेल्या 40 वर्षांपासून मगर कुटुंबिय कलिंगडाचे पीक घेत आहेत. पिकांना ठिंबकद्वारे पाण्याची व्यवस्था केली. त्यासाठी कुंडलिका नदीवर गंगानाला तेथे चार मोठ मोठे बांध घालून पंपाद्वारे पाणी पिकांना दिले जाते. काटेकोर व्यवस्थापनामुळे मगर यांना अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन मिळाले आहे. चांगल्या प्रतिच्या कलिंगडात वाढ झाली आहे. कलिंगडाचा दर्जादेखील चांगला असल्याने व्यापार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आपल्या यशोगाथेनतून श्री. मगर यांनी योग्य व्यवस्थापनाचे महत्त्व पुन्हा एकदा पटवून दिले आहे.


परदेशातही कलिंगडांची होतेय निर्यात
पूर्वी कलिंगड उन्हाळी हंगामातच प्रामुख्याने दिसून यायचे. परंतु, आता अन्य हंगामातही हे फळ बाजारात दिसू लागले आहे. विविध संकरीत वाण, फळांचा दर्जा, वाहतूक, साठवण आदींमध्ये शेतकर्‍यांना फायदा मिळू लागला आहे. परदेशासह देशांतर्गत ग्राहकांकडूनही कलिंगडाला सातत्याने मागणी होत आहे, असे मगर यांनी सांगितले. दर्जेदार व मोठ्या प्रमाणात कलिंगडे उपलब्ध होत असल्याने व्यापारी रोह्यात थेट खरेदीसाठी येत आहेत. फळांचा दर्जा उत्तम असल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, वाशी आदी बाजारपेठांबरोबरच मुंबई येथील व्यापार्‍यांच्या माध्यमातून कलिंगडे दुबईसह अन्य देशांतही निर्यात करण्यात येत आहेत.

Exit mobile version