| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तप्त काहिली जाणवत आहे. अशातच भर उन्हात नागरिक पोटाला थंडावा म्हणून कलिंगडाचा आधार घेत आहेत. रायगड जिल्ह्यातील सुधागड (पाली) परिसरात कलिंगडाचा हंगाम सुरू झाला असून, सतत गजबजलेल्या उन्हेरे फाटा व स्थानिक बाजारपेठेत या फळाची विक्री जोरात सुरू झाली आहे.
पाली- सुधागडात उन्हाच्या झळा अधिक तीव्र आहेत, त्यामुळे येथे कलिंगडाला मोठी मागणी दिसून येते. तसेच, सुधागड तालुक्यातील ओसाड आणि नापीक जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कलिंगडासारखे नंदनवन फुलवण्यात येत आहे. हे पीक साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लावले जाते. पाली खोपोली राज्यमहामार्गावर उन्हेरे फाटा येथे मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची आवक सुरू असून, 50 रुपयांपासून 150, 200 अडीशे रुपयांपर्यंत आकारानुसार कलिंगड उपलब्ध आहेत.
गोड, रसाळ व गरेयुक्त कलिंगड ग्राहकांच्या पसंतीस येतायत. दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत असल्याने कलिंगड खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड पहावयास मिळते. येथील उन्हेरे फाट्यावर 20 ते 25 वर्षांपासून कलिंगड विक्रीचा व्यवसाय करणारे सुनिल ठोंबरे म्हणाले की अनेक वर्षे मी इथं व्यवसाय करतो. यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत कलिंगडाचे दर जास्त आहेत. सध्या 20 ते 25 हजार रुपये टन कलिंगड मिळत आहेत. येथील कलिंगड उच्च प्रतीचे गोड कलिंगड मिळतात. सध्या पाली, रोहा, इंदापूर माणगाव महाड भागात कलिंगड लागवड करण्यात आली आहे. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
उरणमध्ये अलिकडच्या काळात विविध संकरीत जातींचे वाण विकसित झाल्यामुळे पावसाळ्यात लावलेले विविध जातीचे कलिंगड ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यत उरण मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येते. मात्र, हा मोसम हिवाळ्यात असल्यामुळे कलिंगडाची फारशी विक्री होतेच असे नाही, परंतु महाशिवरात्रीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाळा जाणवायला लागतो. आणि त्याच दरम्यान कलिंगडे बाजारात येतात. यावेळी उन्हाच्या वेदना उशीरा जाणवू लागल्या आहेत. होळी नंतर खऱ्या अर्थाने उन्हाचे चटके बसायला सुरूवात होते. गेल्या आठवड्यापासून उरणमधील विविध स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी निदर्शनास येऊ लागली. काळे आणि पट्टे असलेले कलिंगड विक्रीकरीता उरणमध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहे. 80 रू पासून दोनशे रूपयांपर्यंत नग विकले जात असल्याचे उरणमधील विक्रेत्यांनी सांगितले. दिवसभरात 200 ते 300 नगाची विक्री होत असून सुट्टीच्या दिवशी हा आकडा 400 पर्यंत जातो अशी माहिती ही त्यांनी दिली. एप्रिल आणि मे महिन्यात पारा आनखी चढणार आहे. त्यामुळे कलिंगड फळाला ग्राहकांची पसंती वाढली आहे.
उन्हाच्या काहिलीत कलिंगडाचा आधार
