। परांडा । वृत्तसंस्था ।
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका सुरू असताना ज्येष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील जिल्हे अन् मतदारसंघ पिंजून काढत उमेदवार आणि मतदारांना प्रोत्साहन दिलं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी निवृत्तीचे संकेत दिले होते. परंतु, आता त्यांनी मी म्हातारा झालोय का? असं म्हणत मतदार अन् उमेदवारांचे स्फुल्लिंग जागवलं. धाराशिव येथील परांडा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
हे राज्य आणि या राज्याची सत्ता ज्यांच्या हाती आहे, त्यात महाराष्ट्राचे हित नाही. म्हणून ही सत्ता त्यांच्या हातून काढून घ्यायची आणि सत्ता परिवर्तन करायचं यासाठी मी स्वतः, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि आम्हा सर्वांचे हजारो सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात हिंडतोय. लोकांना सांगतो आहे की सत्ता बदलायची आहे, त्यासाठी तुमची साथ हवी. यात कोणी वय, ऊन, वारा, पाऊस काही बघत नाही, असं शरद पवार म्हणाले.
खासदार ओमराजे यांनी अतिशय चांगली भूमिका मांडली. पण त्यांची एक गोष्ट मला पटली नाही. ते बोलता बोलता म्हणाले की पवार साहेब या वयातही हिंडतात. मी काय म्हातारा झालोय का? आता एक म्हातारं इथं दुसर्याच्या खांद्यावर बसून आलेलं. त्यामुळे मी म्हातारा झालेलो नाही. हे सरकार बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. या लोकांच्या हाती सत्ता देऊन तुमच्या प्रश्नांची सोडवणूक या महाराष्ट्रात होते हे बघितल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही, असंही शरद पवार मिश्किलीत म्हणाले. सत्ता बदल कशासाठी आणि कोण करणार? तरी एक वर्षांपूर्वी आम्ही दिल्लीत ठरवलं की केंद्रामध्ये काही बदल करता येतील का? त्यासाठी तयार केलेल्या आघाडीचे नाव ठेवलं इंडिया आघाडी. महाराष्ट्रात लोकसभेला तुम्ही बदल केलात. या देशाची घटना तुम्ही वाचवली. घटना आणि माणसांचा अधिकार वाचवण्याचं काम तुम्ही केलं. आता विधानसभेची निवडणूक आहे. विधानसभा तुम्हा लोकांच्या विचारांच्या हाती हवी. तुम्ही जे आमदार निवडून द्याल त्यांच्या हाती सत्ता हवी. लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडवता येतात, असंही शरद पवार म्हणाले.