आम्ही चालवू हा स्वच्छतेचा वसा

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम
तब्बल 53 टन कचर्‍याचे संकलन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

समाज परिवर्तनासाठी आपल्या अमूल्य समर्थ विचारांनी उत्तम दिशा देण्याचे महान कार्य गेली अनेक दशके धर्माधिकारी कुटुंबाकडून अविरतपणे सुरु आहे. स्वच्छतेचे महत्व या बाबीची जाणीव प्रत्येक व्यक्तीला व्हावी व प्रत्येकाच्या हृदयात उतरावी म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत 29.80 किलोमीटर रस्ता,23164 परिसर व 3किलोमीटर समुद्र किनारा स्वच्छता करण्यात आली. तब्बल 53 टन कचर्‍याचे संकलन करण्यात आले.

जेष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त देशाचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता अभियान 1 मार्च 2022 रोजी राबविण्यात आले. सकाळपासून श्रीसदस्य हातामध्ये झाडू, पंजे, फावडे, कोयते, टेम्पो, ट्रॅक्टरसह,जेसीबी अशा एकूण 41 वाहनांसह गावांतील सर्व रस्ते, समुद्र किनारे,स्मशानभूमि येथे स्वछता करण्यात आली. यावेळी रेवदंडयाचे सरपंच मनिषा चुणेकर, सदस्य शरद गोंधळी, राजन वाडकर, सुरेश खोत, संतोष मोरे यांनी सुध्दा या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला.

या स्वच्छता अभियानामध्ये अलिबाग, रोहा व मुरुड तालुक्यांतील एकूण 3549 श्रीसदस्यांनी संपूर्ण रेवदंडा गावामधील एकूण 29.08 किमी दुतर्फा अंतर्गत रस्ते (रेवदंडा जुनी पोस्ट गल्ली, वाडी मोहल्ला, मोठा कोळीवाडा, मधला कोळीवाडा, भणसाळी आळी, आगर आळी, पागार मोहल्ला, रेवदंडा हायस्कूल स्टॉप अंतर्गत अमरधाम स्मशानभूमी, रेवदंडा बहिरी गल्ली, नारायण आळी, सुतार आळी, कुंभार आळी, गणपती आळी, विठोबा आळी, वसईकर आळी, रेवदंडा पारनाका श्रीमारुती आळी, बापदेव मंदिर गल्ली, चुणेकर आळी, गोरेगांवकर गल्ली, सातखणी चर्च, आगर कोट किल्ला रस्ता) शाळा, मैदान, मंदीर परिसर व दोन स्मशानभूमी असे परिसर व समुद्र किनारा 3 किमी स्वच्छ केला असून, त्यातून 53 टन कचरा गोळा करण्यांत आला आहे. सदर कचरा रेवदंडा ग्रामपंचायत यांच्या सहमतीने बायपास येथील वरसोलकर यांचे खाजगी जागेत जमा करणेत आला. या वेळी टेम्पो, ट्रॅक्टर,डंपर व जेसीबी अशा एकूण 41 वाहनांचा वापर करणेत आले.

Exit mobile version