माथेरानचे माथेरानपण जतन करीत माथेरानला जगप्रसिद्ध करायचे आहे-आदित्य ठाकरे

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरानची लाल माती आणि जांभा दगडाचे रस्ते यातून शाश्‍वत विकास करायचा असून त्यातून माथेरानचे माथेरानपण जतन करायचे आहे असे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. माथेरान मधील शाश्‍वत विकास करताना रोजगार निर्मिती करायची आहे,त्यात माथेरान मधील हॉस्पिटल नजीकच्या काळात सक्षम करता येईल असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. माथेरान गिरीस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उदघाटन सोहळा रविार 24 ऑक्टोबर रोजी माथेरान येथे पार पडला. राज्य सरकारच्या नगरविकास आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे पर्यटन विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. त्यात माथेरान मधील 100 वर्षे जुन्या असलेल्या करसनदास मूळजी वाचनालयाचे तसेच पालिकेच्या सभागृहाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह असे देण्यात आले असून त्या सभागृहाचे नामकरण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माथेरान मधील नऊ विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने झाले. राज्य सरकार माथेरान पुनर्जीवित करून माथेरान जगप्रसिद्ध करायचे आहे असे स्पष्ट केले. माथेरानबद्दल कोणाला काही सांगायची गरज नाही अशी माथेरानची स्वतःची ओळख आहे. त्यासाठी माथेरानसाठी जी जी कामे होत आहेत आणि करावी लागणार आहेत हे पाहण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम आवर्जून रद्द केला असल्याचे नमूद केले. आपल्याला या ठिकाणी येताना अनेक निवेदने दिली जात होती, त्यात हॉस्पिटलचा प्रश्‍न मांडला जात होता, त्यामुळे माथेरानशमधील हॉस्पिटल सुधारण्याचे काम काही महिन्यात करायचे आहे असे जाहीर केले. त्यासाठी सीएसआर फंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि महाबळेश्‍वर मधील हॉस्पिटल सारखे हॉस्पिटल उभारले जाईल असे आश्‍वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.कोरोना काळात माथेरान जागतिक स्तरावर गेले आहे, त्यामुळे माथेरानची स्वतःची ओळख निर्माण झाली आहे ती पुसली जाऊ नये यासाठी पर्यावरण पूरक विकास करण्याचा सरकारचा मनोदय असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

माथेरानमध्ये विकास होत असताना तो विकास शाश्‍वत असला पाहिजे आणि त्या विकास करताना स्थानिकांबरोबर घेऊन करायचे आहे. स्थानिकांना रोजगार करणारा हा शाश्‍वत विकास माथेरान मध्ये केला जाणार असून त्यातून रोजगार निर्मिती करण्यावर राज्य सरकार भर देणार आहोत. माथेरान पालिकेने उभारलेले सभागृह बघून मला हे देशातील सर्वात सुंदर सभागृह वाटत असून हे सभागृह प्रमाणे माथेरान हे सुंदर बनवायचे आहे आणि त्यासाठी आपली सर्वांची भूमिका असणार आहे असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले. माथेरानमध्ये पर्यटन दूत बनवलेले आदेश बांदेकर यांनी माथेरान चा विकास मनावर घेतला आहे, कारण आठवड्यातील एक दिवस ते माथेरानचे प्रश्‍न मांडत असतात. त्यामुळे ते माथेरानचे मुंबईमध्ये दूत असल्याची सातत्याने जाणीव होत असते. तर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर असल्या तरी मुंबई बरोबर माथेरानचे प्रश्‍न आणत असतात. लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलेल्या त्या विकासकामांमध्ये ओलम्पिया ग्राउंडचा पुनर्विकास करणे, माथेरान शहरातील मुख्य रस्ता ते लॉर्ड पॉईंट रस्ता विकसित करणे, मुख्य रस्ता ते बिग चौक पॉईंट रस्ता विकसित करणे, प्रीती हॉटेल ते पॅनोरमा हॉटेल रस्ता विकसित करणे आणि क्ले पेव्हर ब्लॉक लावणे, स्लाटर हाऊसचे नूतनीकरण करणे, पंचधील नगर येथील शौचालाय नूतनीकरण करणे, मुख्य रस्ता ते मंकी पॉईंट हा रस्ता विकसित करणे, मुख्य रस्ता ते कोरोनेशन पॉईंट रस्ता विकसित करणे तसेच माथेरान नगरपरिषद हद्दीत बसविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण डस्टबिनचे लोकार्पण झाले. त्यावेळी आदेश बांदेकर, मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार श्रीरंग बारणे, आ. महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्यासह माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, आकाश चौधरी, मनोहर भोईर, रेखा ठाकरे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Exit mobile version