। अलिबाग । प्रतिनिधी ।
आमच्यात आणि राष्ट्रवादीमध्ये थोडीबहूत नाराजी आहे. येत्या सोमवारी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर आम्ही सर्व वाद मिटवू. मात्र, टोकाची भूमिका घेण्याइतकं कोणतंही कारण नाही, असं शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे अनंत गिते यांनी केलेल्या त्या वक्तव्यावरुन पडलेल्या ठिणगीवर पाणी टाकण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. याशिवाय स्वबळावर लढण्याची ताकद शिवसेनेत नसल्यामुळे वाद वाढवण्याची हिम्मत पदाधिकारी करीत नसल्याची टिकाही कार्यकर्त्यार्ंकडून केली जात आहे. महाड पूर नियंत्रण समितीच्या बैठकीनंतर खासदार तटकरे आणि आमदार गोगावले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी रायगडमधील शिवसेना आमदारांना पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बोलताना गोगावले यांनी डीपीडीसी बैठकीनंतर आम्ही सर्व वाद मिटवू, असे गोगावले म्हणाले.
आ. भरत गोगावले यांची सारवासारव
अनंत गिते यांनी टीका केली त्या कार्यक्रमाला मी नव्हतो. मी फक्त बातम्या ऐकल्या. पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या पक्षाचे आदेश पाळतात, तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश पाळतो. आमच्यात आणि राष्ट्रवादीमध्ये थोडीबहूत नाराजी आहे. येत्या सोमवारी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर आम्ही सर्व वाद मिटवू. मात्र, टोकाची भूमिका घेण्याइतकं कोणतंही कारण नाही, असं शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.
महाविकास आघाडी ही केवळ तडजोड
शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाही. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे, असं शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते म्हणाले होते. गिते यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेनेला हादरे बसताना दिसत आहेत. अनेक शिवसैनिकांनी खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याबाबत तक्रारी केल्या आहेत. आघाडीतील प्रमुख पक्ष असूनही शिवसेनेला जिल्ह्यात योग्य सन्मान मिळत नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.