रत्नागिरीत सर्व आठवडाबाजार बंद

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय
रत्नागिरी | वृत्तसंस्था |
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भावात वाढ होऊ नये, यासाठी जिल्ह्यात सुरू असलेले आठवडा बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत आहेत, असे आदेश रविवारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जारी केले. जिल्ह्यात काही ठिकाणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आठवडीबाजार सुरू केल्याची गंभीर बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या निरीक्षणानंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ होऊ नये व ओमिक्रॉनचा प्रसार होऊ नये, याकरिता अधिकची काळजी म्हणून काही निर्बंध लावणे आवश्यक आहेत. जिल्ह्यातील काही ठिकाणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आठवडाबाजार सुरू केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आठवडाबाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश जारी केले.
जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये हे आदेश लागू झाले. ओमिक्रॉनमुळे अधिक धोका निर्माण झालेला आहे. या कारणास्तव शासनाने आदेशामध्ये अंशत: बदल करून सुधारित निर्बंध लावले आहेत. जिल्ह्यात तिसर्‍या लेव्हलचे निर्बंध लागू केले होते. या निर्बंधानुसार जिल्ह्यात आठवडा बाजार सुरु करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नव्हते. तरीही अनेक ठिकाणी परवानगी न घेता आठवडा बाजार सुरू केले होते.
सीईओ, गटविकास अधिकार्‍यांवर जबाबदारी
शहरी भागात अंमलबजावणी होत आहे की नाही, याबाबत सर्व मुख्याधिकारी यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात सर्व गटविकास अधिकारी यांनी आदेश दिले आहेत. कोव्हिड-19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात नमूद केले.

Exit mobile version