पेण तालुक्यात ओल्या दुष्काळाचे सावट

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्याला गेला आठवडाभर पावसाने अक्षरश: झोडपून काढलेले आहे. हमरापूर, वाशी, वडखळ आणि कासू विभाग पूर्णता भाग पाण्याखाली गेला असून 100 टक्के भात पिकाची रोपं पूणर्ता नष्ट झाली आहेत. पुन्हा नव्याने भात रोप तयार करणे आता शेतकऱ्याला शक्य होणार नाही. आणि जरी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करायचे ठरविले तरी शेतकऱ्याला हवे असणारे बि-बियाणे पेण तालुक्यात उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे एकंदरीत पेण तालुक्याचा निम्याहून जास्त भाग यावर्षी ओसाड राहणार यात काही शंका नाही. त्यामुळे पेण तालुक्याचा हमरापूर, वाशी, वडखळ, कासू विभागाला ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पूर्णता भाताची रोप गेल्याने शेतकऱ्यांजवळ कोणताच मार्ग उरलेला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम तालुक्यातील भात उत्पन्नावर होणार यात काही शंका नाही. सदर बाबतीं बाबत कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्याशी भ्रमन्तीध्वनी वरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पेण तालुक्याच्या पूर्व विभागात लावणी जवळपास पूर्ण झाली आहे. परंतु खारेपाटात उशीरा पावसाची सुरूवात झाल्याने भाताची रोपं तयार झाली नव्हती. त्यामुळे या विभागातील लावणीला सुरूवात झाली नव्हती. त्यातच गेली दहा दिवस होणाऱ्या पावसामुळे भात शेतींच्या रोपांची पूर्णता वाताहात झाली आहे. तसे आम्ही पंचनामे करून शासनाला पाठवत आहोत. तसेच, पाठवलेल्या माहितीच्या आधारे शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. जेणेकरून जो निर्णय होईल तो बळीराजाच्या हिताचाच असेल.

Exit mobile version