। पेण । प्रतिनिधी ।
तालुक्यात 11 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची मुदत संपल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये तरणखोप, बेलवडे, महलमिरा डोंगर आणि बोरगाव या ग्रामपंचायतींवर प्रसाद म्हात्रे, वाशी या ग्रामपंचायतीवर तेजस्विनी वर्तक, बोरी, दिव या ग्रामपंचायतींवर विक्रांती तांडेल, वडखळ या ग्रामपंचायतीवर सुनील गायकवाड, दुष्मी, वरवणे या ग्रामपंचायतींवर अमित काळे, बळवली या ग्रामपंचायतीवर नितीन भोसले यांचे प्रशासक म्हणून नेमणूक केली असून, या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सप्टेंबरनंतर होण्याची शक्यता आहे. मात्र, आता पेण तालुक्यात महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर प्रशासक बसले आहेत. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या वर्चस्वाला कळत-नकळत धक्का बसला आहे एवढे नक्की. जोपर्यंत निवडणुका होत नाही, तोपर्यंत प्रशासक म्हणून वरील अधिकारी काम पाहणार आहेत.