| उरण | प्रतिनिधी |
विविध कारणांनी उरणमधील पाणथळीची संख्या घटू लागल्याने दरवर्षी या परिसरात येणाऱ्या दोन ते अडीच लाख पक्षांच्या संख्येत घट झाल्याचे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले आहे. उरणचे खाडी किनारे आणि पाणथळी या हजारो पक्षाचे खासकरून फ्लेमिंगोचे उरण हे एक महत्वाचे ठिकाण होते. मात्र, येथील पाणथळीवर होणारा मातीचा भराव, वाढती उष्णता आदी विविध कारणांमुळे येथील पाणथळी झपाट्याने नष्ट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पक्षी अन्नाच्या शोधात परिसरातील छोट्या पाणथळीवर येऊ लागले आहेत. मात्र, या पाणथळी आणि येथील अन्न केव्हा पर्यंत असेल हे सांगता येत नाही.
उरण परिसरात साधारणपणे ऑक्टोबर अखेर पर्यंत अनेक जातींचे पक्षी येथील पाणथळीवर दाखल होतात. यामध्ये उरणच्या जेएनपीटी बंदर परिसर पाणजे, फुंडे, जासई, करळ आदी भागातील पाणथळीवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने पक्षी येतात. हे पक्षी पाहून त्यांचे निरीक्षण करण्यासाठी शेकडो पक्षी प्रेमी या भागात येतात. याचे मुख्य कारण म्हणजे येथील खाडीत मिळणारे या पक्षांचे अन्न आहे. अनेक वर्षांपासून हा परिसरात हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करीत येत आहेत. मात्र, अनेक कारणांनी उरणच्या पाणथळ जागा हळूहळू नष्ट होऊ लागल्याने या ठिकाणी येणाऱ्या पक्षांची संख्या कमी होऊ लागली आहे.
ही संख्या कमी होऊ नये येथील पाणथळ जागा टीकाव्यात यासाठी पर्यावरणवादी सातत्याने प्रयत्नशील आहेत. याकरिता न्यायालयीन लढाई ही ते लढत आहेत. या पाणथळीचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी ही लढाई सुरू आहे. उरण आणि नवी मुंबईमध्ये येणारे पक्षी हे सैबेरिया या देशातून येत असले तरी यातील हजारो पक्षी हे गुजरात मधील कच्छ प्रांतात वास्तव्यास असतात. हजारो स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांचे ठिकाण असलेल्या प्रमुख पाणथळ जागा, एकतर गाडून किंवा आंतरभरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखून पद्धतशीरपणे नष्ट केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे समितीने तक्रार पेटी उघडली पाहिजे जेणेकरून सतर्क नागरिकांना त्यांच्या तक्रारी नोंदवता येतील.
अधिकाऱ्यांद्वारे त्यांची तपासणी केली जाऊ शकते आणि एईएमसीद्वारे त्यांची समीक्षा केली जाऊ शकते. तर बीएनएचएसने सूचीबद्ध केलेल्या सहा प्रमुख पाणथळ जागांपैकी बेलपाडा येथील एक जेएनपीएला भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती आणि भेंडखळ आणि पाणथळ जागा एनएमएसईझेडला (आता एनएमआयआयए) विकण्यात आल्या आहेत. उरणच्या मोठ्या पाणथळ जागा नष्ट झाल्याने सद्या अनेक पक्षी हे उरण-पनवेल मार्गावरील उरण रेल्वे स्थानकांच्या शेजारील भरतीचे पाणी साचत होते हा पाणथळ परिसर ही मातीचा भराव टाकून बुजविण्यात आला आहे. त्यामुळे आता पक्षांना खाद्यपदार्थ शोधत बसावे लागणार आहे. उरणच्या पाणथळी वेगाने नष्ट होत आहेत. त्यामुळे येथील पाणथळीवर येणाऱ्या दोन ते अडीच लाख पक्षी संख्या घटून ती जवळपास एक लाखाने कमी झाल्याचे मत पर्यावरणवादी निकेतन ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. तर पक्षी हे जैवविविधता राखणारा महत्वाचा दुवा तसेच वातावरण आणि पाणी स्वच्छ ठेणारे देवदूत असल्याचेही स्पष्ट केले आहे.
उरणमधील पाणथळी नष्ट होण्याच्या मार्गावर
