तीन तस्करांना ठोकल्या बेड्या; श्रीवर्धन पोलिसांची मोठी कारवाई
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध वन्यजीव तस्करीविरोधात कारवाई करत सुमारे तीन कोटी 96 लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. या धडक कारवाईत एकूण 3.960 किलोग्राम व्हेल माशाची उलटी आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, जिवणा कोळीवाडा येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोमवारी (दि.5) सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास एका मोटरसायकलवरून बेकायदेशीरपणे व्हेल माशाची उलटी वाहून नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख व त्यांच्या पथकाने तत्काळ जिवणा पार नाका, श्रीवर्धन येथे नाकाबंदी करून मोटरसायकल अडवली. मोटारसायकलचालक विराज महेंद्र चौलकर (वय 25, रा. जिवणा कोळीवाडा, ता. श्रीवर्धन) याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात 604 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी आढळून आली.
सखोल चौकशीतून मुख्य साठा उघड
पोलिसांनी आरोपी विराज चौलकर याची कसून चौकशी केली असता, त्याने हा साठा ऋतुराज रामचंद्र रघुवीर (19) तसेच त्याचे वडील रामचंद्र रघुवीर (वय 46, दोन्ही रा. जिवणा कोळीवाडा) यांच्याकडून मिळवल्याचे कबूल केले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रामचंद्र रघुवीर यांच्या राहत्या घरात छापा टाकून तेथून आणखी 3.356 किलोग्राम वजनाची व्हेल माशाची उलटी हस्तगत केली.
या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 7 ऑक्टोबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विजयकुमार देशमुख करीत आहेत.
