आमच्या रोजगाराचे काय?

सुशिक्षित तरुणांचा लोकप्रतिनिधींना सवाल

| तळा | वार्ताहर |

शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकारातून रोजगार मेळावे भरविण्यात आले. त्यातून जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळाला असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मग, आमच्या मतदारसंघातून निवडून गेलेल आमदार काय करतात, असा सवाल येथील बेरोजगार तरुणांकडून विचारला जात आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याची, त्यांच्या पोटापाण्याची काहीतरी जबाबदारी यांची आहे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

तळा तालुक्यात शेकडो सुशिक्षित तरुण रोजगारापासून वंचित आहेत. या तालुक्यातील बेरोजगारांना कोण नोकरी देईल अशा आशेने गेली पंचवीस वर्षे वाट पाहात आहेत. आज येथील बेरोजगार तरुण आम्हाला कोण नोकरी देईल का, अशी आर्त हाक मारत असताना दिसत आहेत. या तालुक्यात ना कारखाना, ना कंपनी, मग यांनी काय करावे, काय खावे, असा प्रश्‍न आहे. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी रोजगार मेळावा घेत अनेक कंपन्यांमधून तरुण लोकांना रोजगार नोकरी मिळवून दिली. जवळपास पाच हजार तरुणांना नोकरी मिळवून दिल्याने तरुणवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मग आमच्या श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार काय करतात, असा सवाल बेरोजगार तरुणांच्यावतीने केला जात आहे.

गावांच्या भौतिक सुविधा घेण्यात आणि देण्यात रममाण झालेले हे लोकप्रतिनिधी कधीतरी विचार करतील का? या तालुक्यातील तरुण हा रोजगारासाठी वणवण भटकत आहे. ही भटकंती थांबली नाही, तर त्याचे परिणाम भविष्यात राजकारणात बघायला मिळतील, हेही तितकेच खरे आहे.

Exit mobile version