या संघांना झालंय तरी काय?

विश्वचषक 2023 अर्ध्यावर येऊन पोहोचला. यावेळी गुणतालिकेत टॉप फोरमध्ये गतविजेते इंग्लंड असायला हवे होते. ते नाहीत, ते तळाला आहेत. भारतीय उपखंडातील विश्वचषक म्हणजे भारताप्रमाणे पाकिस्तान संघ देखील दादाच असायला हवा. पाठोपाठ आशियाई खेळपट्ट्या व हवामानाचा अंदाज असलेला श्रीलंका संघ देखील उपांत्य फेरीसाठीच्या चार फेव्हरिट संघांत होता. प्रत्यक्षात काय झालं?

इंग्लंड संघ शेवटी. अगदीच ढेपाळला. ‌‘बाझ बॉल’ क्रिकेटने तमाम क्रिकेट विश्वाला प्रेमात पाडणारा इंग्लंड संघ आहे कोठे? इंग्लंडचा विद्यमान कप्तान जोस बटलर तर आयपीएल वेड्या भारतीय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईतच बनला आहे. आयपीएलमध्ये गेल्या दोन हंगामात त्याच्या इतक्या सफाईने कोणत्याच फलंदाजाची बॅट तळपली नव्हती. त्या बटलरच्या बॅटीतील धावा एवढ्या आटल्या आहेत की तो तळाचा फलंदाज वाटावा. सामना कधीही फिरविण्याची क्षमता असलेल्या स्टोक्सचे निवृत्तीतून बाहेर पडत संघांत येणे, इंग्लंडसाठी फारसा फरक पाडू शकले नाही. माजी कप्तान ज्यास रुट यालाही सूर गवसला त्याचाही फॉर्म गेला. लिविंगस्टोन, मोईन अली हे तर आयपीएलचे हिरो होते. त्यांनाही काय झाले कुणास ठाऊक, त्यांनाही ना धावा काढता येत ना बळी घेता येतं. मार्क वूडस व ख्रिस वोक्स हे देखील अचानक धोकादायक गोलंदाज वाटेनासे झालेत. असं काय झालं असेल की इंग्लिश क्रिकेटपटूंचा सर्वांचा एकाच वेळी फॉर्म गेला. खरं तर इंग्लंड संघ गेली दोन वर्षे आक्रमक क्रिकेट खेळतोय. क्रिकेटचा अतिरेक झाला की तो प्रथम संघांतील खेळाडूंच्या फॉर्मवर परावर्तीत होताना दिसतो. संघाचा उंचावत जाणारा विजयाचा आलेख अचानक खाली खाली यायला लागतो. संघांतील प्रमुख खेळाडूंच्या दुखापती वाढायला लागतात. फॉर्म नको त्यावेळी उंचावला तर इंग्लंड संघ ज्या परिस्थितीतून जातोय, ती स्थिती ओढावते. सर्वच खेळाडू ‌‘गळून’ गेल्यासारखे वाटतात. त्यांच्यात आपण गतविजेते आहोत ही भावनाच दिसत नाही. ज्या सहजपणे त्यांनी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेच्या 400 धावांच्या आव्हानासमोर शस्त्रे टाकली, त्यावेळी हाच का तो इंग्लंडचा लढवय्या संघ असा प्रश्न पडला.

दुसरीकडे पाकिस्तानच्या बाबतीत हाच तो पाकिस्तानचा संघ असे वाटते. हा संघ एकाच वेळी दोन प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढत असतो. मैदानावर समोर असलेल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आणि मैदानाबाहेर स्वत:च्याच सहकाऱ्यांशी. पाकिस्तानचे 1992 ला विश्वविजेतेपद पटकाविले. त्यावेळी हा संघ आपसामध्ये भांडतच होता. भारताविरुद्ध सिडनी येथील सामना गमाविल्यानंतर कप्तान इम्रानखान प्रत्येक खेळाडूच्या खानदानाचा उद्धार करतानाचा प्रसंग मी स्वत: पाहिलाय. खाली मान घालून उभे असलेले पाकिस्तानचे खेळाडू नंतर पेटून उठले. विशेषत: भारताविरुद्ध सामना हरल्यानंतर त्यांना स्वगृही ज्या रोषाला जावे लागते त्यानंतर हा संघ पेटून उठतो. पण यावेळी उठला नाही. उलट नवोदित अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यातही नामुष्की स्वीकारुन हरला. यावेळी, काय तर म्हणे कप्तान बाबर आझम याच्यावर नाराज असणाऱ्यांचा गट सक्रीय झाला. दोन खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध सामन्याआधी मारामारी झाली. संघांतील खेळाडूंची तोंडे एकमेकांविरुद्ध होती. परिणाम आपण पाहतोय. पाकिस्तान संघ सध्या तरी बाद फेरीतील संभाव्य संघांच्या चौकटीबाहेर आहे.

बांगलादेशही यावेळी संघांतील दुफळी रोगाचा बळी होता. विश्वचषकाआधीच या संघात तमीम इक्बालच्या समावेशावरुन घमासन युद्ध झाले. तमीमला कप्तानपद नाही तर संघांतील एक खेळाडू म्हणून स्थान देण्याचे ठरले. पण तमीमने आपण विश्वचषक पाच सामनेच खेळणार हे जाहीर केल्यानंतर विद्यमान कप्तान शाकिबने राजीनामा देण्याची धमकी दिली. हे युद्ध संपविण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधानांना मध्यस्थी करावी लागली. ऐन विश्वचषकाआधीच्या या चकमकीमुळे बांगलादेशाचा संघ देखील लढावुवृत्ती दाखविण्याच्या मूडमध्ये दिसला नाही. आशिया खंडातल्या दोन झुंजार संघांची ताकद अशी आपसातील भांडणामूळे कमी झाली.

श्रीलंका संघाचे दु:ख मात्र वेगळे होते. विश्वचषकाआधीच त्यांना त्यांचा हुकमी एक्का फिरकी गोलंदाज हसरंगा गमवावा लागला. तो आघात कमी होता म्हणून, कप्तान दसुन शनाका जायबंदी झाला. उदयोन्मुख वेगवान गोलंदाज पथीराना जायबंदी झाला. या पडझडीत एक गोष्ट मात्र चांगली झाली ती म्हणजे पथीरानाच्या जागी अनुभवी ॲन्डोलो मॅथ्युज याला श्रीलंकेने भारतात पाठविले. शेवटी अनुभवाचा फायदा झालाच. मॅथ्युज्‌‍च्या अपयशानंतर श्रीलंकेने गतविश्वविजेत्या इंग्लंडचा डाव 156 धावात गुंडाळण्याचा पराक्रम केला.

Email: vinayakdalvi41@gmail.com

Exit mobile version