जबरदस्तीच्या मित्रांसोबत मांडीला मांडी लावून बसावे लागणार
| रायगड | आविष्कार देसाई |
जिल्हा नियोजन समितीच्या रविवारी (दि.30) बैठकीमध्ये आता चांगलाच ट्विस्ट पहायला मिळणार आहे. गेल्यावेळच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात होती. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे शिंदे गटाने ज्यांना टोकाचा विरोध केला होता त्यांच्या सोबतच मांडीला मांडी लावून जिल्ह्याचा विकास साधावा लागणार आहे. दरम्यान, या बैठकीत निधी वाटपाचे सूत्र कसे ठरणार, याकडेही लक्ष लागून राहिलेले आहे.
शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची दोन शकले झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस कामांमध्ये ढवळाढवळ करत असल्याची ओरड शिंदे गटाने केली होती. रायगड जिल्ह्यातून सर्वप्रथम राष्ट्रवादीला विरोध करण्याचे रणशिंग फुकण्यात आले होते. जिल्ह्यातील शिंदे गटाचे आ.भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे हटावची मोहीम उघडली होती. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून ते थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्या आमदांराचा मंत्रीमंडळात समावेश देखील झाला. उघड्या डोळ्यांनी याकडे पाहण्याशिवाय शिंदे गटाकडे पर्याय राहिला नव्हता. ज्यांच्या कार्यशैलीला कंटाळून टोकाचा विरोध करुन ठाकरे सरकार पाडले. आता त्याच राष्ट्रवादी काँग्रेसला आता मित्र म्हणून मांडीवर घेण्याची वेळ शिंदे गटातील आमदारांवर आल्याचे बोलले जाते.
तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या कालावधीत जिल्हा नियोजन समितीमधील अधिकचा निधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवल्याची ओरड शिंदे गटासह भाजपाने केली होती. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्याच मांडीला मांडी लावून शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांना बसावे लागणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचे सूत्र कसे असणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकचा निधी घेतला, तर कोणाला आर्श्चय वाटायला नको. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत, हे देखील विसरुन चालणार नाही.
आ. भरत गाेगावलेंची स्वप्न अपुरेच…
मंत्रीपद आणि पर्यायाने रायगडचे पालकमंत्री हाेण्याचे आमदार भरत गाेगावले यांचे स्वप्न अपुरेच राहीले आहे. मीच रागयडचा पालकमंत्री हाेणार अशी वल्गना आमदार गाेगावले हे सातत्याने करत हाेते. ते पालकमंत्री झाले असते, तर उद्याची जिल्हा नियाेजन समितीची बैठक त्यांच्याच अध्यक्षतेखाली झाली असती आणि आमदार गाेगावले यांना भरुन पावले असते. परंतू पालकमंत्री उदय सामंत यांच्याच अध्यक्षतेखाली सदरची बैठक हाेणार आहे.