| माथेरान | वार्ताहर |
काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलेला असताना माथेरान या पर्यटनस्थळावर अद्यापही आपत्कालीन व्यवस्थे बाबतीत नियोजन करण्यात आलेले नसल्याने भूमिपुत्रांनी नाराजी व्यक्त केली आहे.
माथेरान हे स्थळ 1200 एकरांच्या परिसरात एकूण 52 किलोमीटरमध्ये वसलेले घनदाट जंगलव्याप्त थंड हवेचे ठिकाण असून येथे पावसाचे प्रमाण सरासरी 250 ते 300 इंच इतके असते संपूर्ण उताराचा भाग असल्यामुळे याठिकाणी पाणी साठून रहात नाही. परंतु एमएमआरडीएने बांधलेली गटारे अत्यंत निमुळती असून त्यातून पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. हे पाणी रस्त्यावरून वाहते, त्यामुळे क्ले पेव्हर रस्त्याची दुर्दशा होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी पावसाळ्यात नगरपरिषदेच्या माध्यमातून रस्त्याला बांध घातले जातात त्याबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आलेली नाही. डोंगराळ भाग असल्याने पावसाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे मातीची धूप होत असून परिणामी अतिवृष्टीत झाडे उन्मळून पडतात. अनेक ठिकाणी धोकादायक जागा झालेल्या आहेत त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपत्कालीन प्रक्रिया आहेत त्या युद्धपातळीवर पूर्ण कराव्यात असे नागरिकांमधून बोलले जात आहे.