‘त्या’ शिक्षण विस्तार अधिकार्‍यावर कारवाई कधी?

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

‘तो’ शिक्षण विस्तार अधिकारी पुन्हा एकदा व चर्चेत आला आहे. या अधिकार्‍याचा सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत हा अधिकारी शाळेतील वर्गात जाऊन एका शिक्षिकेला चक्क केक भरवत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.

रत्नागिरी पं.स.मध्ये हा विस्तार अधिकारी कार्यरत आहे. सध्या त्याच्याकडे शहराचासुद्धा पदभार आहे. तीन महिन्यांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील एका शाळेतील मुख्याध्यापिकेला या विस्तार अधिकार्‍याच्या गैरवर्तनाला सामोरे जावे लागले होते. याबाबत त्या मुख्याध्यापिकेने या अधिकार्‍याविरोधात जि.प.कडे लेखी तक्रार केली होती. त्यामध्ये या महिला शिक्षिकेने ‘तो’ शिक्षण विस्तार अधिकारी अपमानकारक व मनात लज्जा होईल, असे वर्तन करत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. यानंतर 8 दिवसांनी पुन्हा शहरातील एका शाळेतील शिक्षिकेने प्रेमाच्या गोष्टी बोलण्यास नकार दिल्याने ‘तो’ शिक्षण विस्तार अधिकारी त्रास देत असल्याची तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारी प्रशासनाकडे दाखल आहेत. आता सध्या सोशल मीडियावर या शिक्षण विस्तार अधिकार्‍याचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. शहरातील एका शाळेत एका शिक्षिकेला केक भरवत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या वेळेत तसेच वर्ग सुरु असताना त्या शिक्षण विस्तार अधिकार्‍याने स्वतः वर्गात केक आणला. यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांना एकत्र बोलवण्यात आले आणि दणक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. हा विस्तार अधिकारी सर्वांसमोर त्या महिला शिक्षिकेला केक भरवत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे अधिकार्‍याने स्वतः केक आणून वाढदिवस साजरा करणे कितपत योग्य आहे, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. आता या गोष्टीला तीन महिने झाले तरी प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे आता तरी प्रशासन कारवाई करेल का, याकडे लक्ष लागले आहे..

Exit mobile version