बॉक्साइड उत्खनन कधी थांबणार?

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील सायडोंगर या ठिकाणी टोरन्ट विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी जंगलतोड सुरू करण्यात आली होती. या जंगलतोडी विरोधात सत्ताधारी सोडले तर अख्खा महाराष्ट्र एकवटला असून, सर्व पक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी आणि जनता या प्रकल्पाला कडाडून विरोध करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यात ब्लास्टिंक करून अनधिकृत बॉक्साइडच्या उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष कधी जाणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

साधारण 2001 पासून श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साइड उत्खननाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. बॉक्साइड उत्खनन करण्यासाठी शासकीय परवानगी घेताना काही ठराविक ब्रासची रक्कम शासनाला अदा करायची व त्या बदल्यात हजारो ब्रास बॉक्साइडचे उत्खनन करायचे, हा धंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. 2014 साली सत्तेत भाजपचे सरकार आल्यानंतर या बॉक्साइट उत्खननाला काही काळ ब्रेक मिळाला. परंतु, मागील सात ते आठ वर्षांपासून बॉक्साइड उत्खनन पूर्वीपेक्षा दुप्पट प्रमणात वाढले आहे. तसेच, ज्या ठिकाणी वृक्षतोड करून बॉक्साइड उत्खनन केले गेले, त्या ठिकाणी पडलेला खड्डा बुजवून वृक्ष लागवड करवी, असा नियम असतानाही अद्यापपर्यंत त्या ठिकाणी संबंधित कंपनीने कोणतीही वृक्ष लागवड केलेली नाही. त्यामुळे तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानंतर वायनाड-केरळ सारखे भूस्खलन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या श्रीवर्धन तालुक्यातील वडघर या ठिकाणी हजारो ब्रास उत्खनन केलेले बॉक्साइड डम्प करून ठेवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे माणगाव तालुक्यातील चांदोरे या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणात बॉक्साइट डम्प करून ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान, रायगडचा प्रादेशिक परिवहन विभाग स्थानिक वाहनांवरती नेहमीच कारवाई करताना आढळून येतो. परंतु, वडघर व चांदोरे या ठिकाणी परराज्यातील क्षमतेपेक्षा जास्त बॉक्सआईड वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट प्रादेशिक परिवहन विभागाकडून आर्थिक तडजोड करून कर्नाटक राज्यातील वाहतूकदारांना नेहमीच अभय देण्याचा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृतपणे सुरू असलेल्या बॉक्साइड उत्खननाबाबत तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील सामान्य जनतेमधून केली जात आहे.

Exit mobile version