कोल्हारे ग्रामपंचायतीमधील रस्त्याकडेची अतिक्रमणे कधी दूर करणार?

महसूल, बांधकाम विभाग आणि प्राधिकरणकडून चालढकल
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमधील रस्त्याच्या कडेला झालेल्या बांधकामाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांच्याकडून उपोषणे केली आहेत. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नेरळ विकास प्राधिकरण यांनी 100 हून अधिक बांधकामे रस्त्यालगत असल्याने त्यांना अनधिकृत ठरवून ती बांधकामे तोडण्यात यावीत, यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत. मात्र महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नेरळ विकास प्राधिकरण यांच्याकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप विजय हजारे यांनी केला आहे. कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत, त्यावेळी सर्व बांधकामे करताना नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरणकडून आराखडा मंजूर करून परवानगी आल्यानंतर बांधकामे करावी लागतात. मात्र, कोल्हारे हद्दीत रस्त्याच्या कडेला बांधकाम रेषा ओलांडून असंख्य बांधकामे झाली आहेत. त्या सर्व बांधकामांना आतापर्यंत अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी दोनवेळा या अतिक्रमण बाबत उपोषण देखील केले होते. एका बांधकामाविरुद्ध विजय हजारे यांनी कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच यांच्याविरुद्ध रायगड जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दाद लागून अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल सदस्य पद रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती.परंतु कोरोना काळात या याचिकेवर अनेकवेळा सुनावणी झाली नाही. ज्यावेळी तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासमोर सुनावणी होती. त्यावेळी सामनेवाले विजय हजारे यांचे वकील जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात त्या विवादावर दोन्ही बाजूंनी चर्चा होत असताना सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उपस्थित राहिले आणि ती याचिका फेटाळून लावली होती.

Exit mobile version