स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीचे घोडे अडले कुठे?

विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
| माणगाव | वार्ताहर |
दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावरील माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्यागिक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत असून, या महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतीत अद्यापही स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती झाली नसल्याने या भागातील सुरक्षितेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होऊन 25 वर्षे लोटली. या औद्योगिक क्षेत्रात देशी-विदेशी कंपन्यांनी आपले जाळे पसरले असून, या भागात अनेक लहान-मोठ्या स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. या एमआयडीसीत स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती होणे गरजेचे असताना अद्यापही पोलीस ठाणे झाले नसल्याने गुन्हेगारीला रान मोकळेच राहात आहे. या स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीचे घोडे नेमके आडले कुठे, असा मार्मिक सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. माणगाव तालुका पोलीस ठाण्यांतर्गत रवाळजे येथे 1982 मध्ये रवाळजे धरणाचे काम सुरु असताना या भागात मोठ्या प्रमाणात मजूर व नोकर आले होते, त्यामुळे शासनाने याचा विचार करून रवाळजे येथे पोलीस दूरक्षेत्राची इमारत उभारून पोलीस कर्मचारी नेमले. या धरणाचे काम संपून 32 वर्षे झाली. त्यानंतर येथील कामगारही निघून गेले, तरीही या ठिकाणचे पोलीस कर्मचारी तेथेच काम करत आहेत. हे पोलीस दूरक्षेत्र एका बाजूला असून, त्याचा उपयोग आजूबाजूच्या गावांना होत नाही.
सध्या विळे-भागाड येथे औद्यागिक क्षेत्राचे कामे गेल्या बारा वर्षांपासून झपाट्याने सुरु असून, विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कामगार येथे कामानिमित्त आलेले आहेत. त्यामुळे निजामपूर, भागाड, विळे यासह अनेक गावांतील बाजारपेठ गजबजलेल्या दिसतात. येथून जवळच ताम्हाणी घाटातील कोंडेथर गावाजवळील घाटात पावसाळ्यात धबधबे व या मार्गांनी पुणे परिसरातून मोठ्या प्रमाणावर येणारे पर्यटक यामुळे, तसेच घाटातील अपघातांचे वाढते प्रमाण बघितले तर दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, या पोलीस दूरक्षेत्राचा उपयोग नागरिकांना मदतीसाठी किंवा तक्रार देण्यासाठी होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून विळे या गावात किंवा औद्यागिक क्षेत्रात स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे, अशी नागरिकांची मागणी गेली अनेक वर्षांपासून आहे. मात्र, या मागणीचा विचार शासनाने अद्यापही केलेला दिसत नाही. त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय maraआर.आर. पाटील यांच्याकडे गृह आणि उपमुख्यमंत्रीपद असताना, त्यांनी राज्यातील औद्यगिक विकास महामंडळाने पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी त्यांच्या सुरक्षितेसाठी त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रासाठी सर्व यंत्रणा व सुविधांसह स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यासाठी औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र पोलीस ठाण्याची इमारत उभारली जाईल, असे सांगितले होते. कोलाड येथे नव्याने स्वतंत्र पोलीस ठाणे सुरु झाले. मात्र, विळे-भागाड एमआयडीसीसाठी शासन अद्यापही उदासीन का? असा सवाल नागरिकातून उपस्थित होत आहे.

दुरक्षेत्र एका बाजूला
या दूरक्षेत्रात रवाळजे, विळे, विळे वरचीवाडी, खालचीवाडी, सणसवाडी, भाऊची आळी, गावठाण, बेडगाव, विळे आदिवासीवाडी, धनगर वाडी, कोंडेथर, पाटणूस, पाटणूस आदिवासीवाडी, पाटणूस धनगर वाडा, भिरा, भिरा वसाहत, भैरेची वाडी, विठ्ठल वाडी, हिर्डी, फणशीदांड, गौळवाडी, गोळे आदिवासीवाडी, म्हसेवाडी, लव्हेलीवाडी, साजे, साजे आदिवासीवाडी, बौद्धवाडी, नारायण गाव, भागाड, भागाड आदिवासीवाडी, तासगाव, तासगाव आदिवासीवाडी या गावांतील सुमारे दहा हजार लोकसंख्या असून, या पोलीस दुरक्षेत्राला जोडल्यामुळे या ठिकाणाहून सध्या कामकाज चालवले जाते. परंतु, रवाळजे हे गाव एका बाजूला असून, अन्य गावे दुसर्‍या बाजूला आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग नागरिकांना फारसा होत नाही.

Exit mobile version