तळ्यातील पाणी मुरले कोठे

शहरवासीयांच्या तोंडाला पुसली पाने; शहराचा विकास खुंटला

| तळा | वार्ताहर |

बहुप्रतिक्षित तळा शहराची पाणी योजना नक्की राबविली जाणार की नाही अशी शंका आता शहरवासीयांना येऊ लागली आहे. कारण सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी आपापल्या परीने आश्वासन देऊनही त्यांना शहराच्या पाणी योजनेचे काम मार्गी लावता आलेले नाही. त्यामुळे सर्वच राजकारण्यांनी शहरवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेली कित्येक वर्षांपासून मूलभूत असलेला पाणी प्रश्न अद्यापही मिटलेला नाही. पाणी योजना राबविण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. मध्यंतरी बॅनर बाजीला देखील ऊत आला होता. मात्र प्रत्यक्षात योजनेचा थांगपत्ताच नाही. योजना नक्की कोठे बारगळली, योजना पूर्ण होण्यास काय अडचण येत आहे याकडे मात्र कोणीही लक्ष देताना दिसत नाही.

सध्या सर्वच पक्षाचे राजकीय पुढारी आपापल्या पक्षाकडून रस्ते,गटारे,सामाजिक सभागृह, संरक्षण भिंत यांसारख्या अनेक कामांसाठी निधीची मागणी करताना दिसत आहेत. मात्र ज्या पाणी योजनेची शहराला अत्यंत आवश्यक आहे. तसेच जी पाणी योजना पूर्ण झाली नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. त्या पाणी योजनेसाठी कोणत्याच पक्षाचा राजकीय पुढारी पाठपुरावा करताना दिसत नाही.त्यामुळे वर्षभर शहरातील ईतर विकासकामे नाही झाली तरी चालतील परंतु शहराची पाणी योजना कशी पूर्ण करता येईल यासाठी नेतेमंडळीनी आपला आर्थिक फायदा बाजूला ठेवून प्रयत्न करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. या आधी पाणी योजना पूर्ण न होण्यामागे प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत होते. मात्र आता एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या सर्वच राजकीय पक्षांची युती झाल्याने आता तरी तळा शहराच्या पाणी योजनेचे काम मार्गी लागेल का?असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

तळा शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर असून पाण्याअभावी येथील नागरिक ईतर तालुक्यात वास्तव्य करतात. परंतु सत्ताधाऱ्यांकडून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे लवकरात लवकर पाणी योजना मार्गी लागली नाही तर शेकाप कडून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करण्यात येईल.

ज्ञानेश्वर भोईर, तालुका चिटणीस शेकाप

तळा शहरासाठी 13 कोटी रुपयांची पाणी योजना राबविण्यात येत आहे. काही अडचणींमुळे ही योजना बरीच वर्षे रखडली आहे. मात्र यातील अडचणी दूर करण्याचे काम सुरू आहे. सध्या पाण्याच्या आरक्षणासाठी ठाणे पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाली की युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली जाईल.

माधुरी मडके, मुख्याधिकारी
Exit mobile version