कोण असतात ही माणसे….?

स्वातंत्र्यासाठी प्राण दिलेली तुरुंगात गेलेली माणसे नेमकी कोण असतात? यांच्या प्रेरणा नेमक्या काय असतात? हा प्रश्‍न माझ्या अनेकदा मनात येऊन गेलेला. मला हाही प्रश्‍न पडतो की देश पेटला वगैरे शब्द अतिरंजित होते कारण तेव्हाच्या 35 कोटीच्या भारतात खरेच सामील झालेली संख्या किती अल्प होती. तुमचे माझे पूर्वज यात कुठेही नव्हते. ते शांतपणे आपला संसार करत होते. त्यांच्यावर फारसा परिणाम होत नव्हता. अशी गप्प बसणारी माणसे सर्व काळात असतात आणि ही माणसे बहुसंख्येने असतात. ती आजही आहेत. गप्प बसण्याला, व्यवस्थेशी पंगा न घेण्याला ही माणसे मुत्सद्देगिरी समजतात. पण अशा स्थितीत स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून देणारी माणसे नेमकी कोण असतील? या माणसांना इतरांसारखे गप्प बसणे व सुखाने जगणे का शक्य झाले नसेल? मला असे वाटते की स्वतःचा विचार न करता अशी मरणाच्या दारात स्वतः होऊन जाणारी माणसे ही हिशोबी नसतात, यांच्या संवेदना खूपच तीव्र असतात, चूक बरोबर व परिणाम यापलीकडे गेलेली असतात.
निर्णयाचा तो क्षण त्यांच्याही हातात राहिला नसेल. मी नाही केले तरी चालणार आहे असे हिशोबीपण चुकूनही मनात आले नसेल.
या माणसांची सद्सद्विवेकाची बोचणी खूपच तीव्र असेल. त्यांना गप्प राहणे अशक्य झाले असेल. आणि त्या क्षणी त्यांनी स्वतःला झेपावून टाकले असेल. ही प्रेरणा नेमकी काय असेल हे मला नेहमीच विचारमग्न करते.
आणखी एक विचार नेहमी अस्वस्थ करतो.
यातील सामान्य गरीब कुटुंबातील माणसे बघून मला तर नेहमीच अस्वस्थ व्हायला होतं. आम्हाला इंग्रजीच्या पाठपुस्तकात एका गरीब कुटुंबातील एका मुलाचा धडा होता. तो आणि त्याची गरीब आई तामिळनाडूच्या खेड्यात राहत असतात. एक दिवस तो स्वातंत्र्य संग्रामात सामील होतो. पोलिसांच्या लाठीमारात मारला जातो. त्याचे प्रेत घरी आणले जाते. ती म्हातारी एकाकी आई त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवते किंवा सानेगुरुजींचा तो प्रसंग. हे सारं आठवलं की विलक्षण उदासी येते. या कुटुंबांचे खरेच पुढे काय होत असेल? कशी जगली असतील ही माणसे? हरी नरके यांनी आज एका स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नीला पतीच्या स्मारकाच्या कामावर मजुरी कशी करावी लागली याचे हलवून टाकणारी पोस्ट लिहिली आहे.
हे सारे बघता खरेच या माणसांच्या मृत्यूनंतर या माणसांच्या कुटुंबाकडे समाजाने किती लक्ष दिले? हेही अतिशय अस्वस्थ करणारे आहे. माणसे एका क्षणी स्वतःला झोकून देतात आणि नंतर समाज त्यांना विसरून जातो त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो.
त्यात आदिवासी स्वातंत्र्ययोद्धे बघून तर माझ्या मनात वेगळाच मुद्दा येतो. ते गरीब असल्याने कुटूंबाची वाताहत झाली हे तर झालेच पण ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले त्या स्वातंत्र्याने त्यांच्या आदिवासी बांधवांना खरेच काय दिले?
– हेरंब कुलकर्णी

Exit mobile version