| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील खवसावाडी या आदिवासी वाडीतील महिलेचा मृतदेह रस्त्याअभावी चार किमी पायपीट करुन घरी आणावा लागल्याच्या वृत्तामुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे झोपेतून जागे झालेले प्रशासन चोरपावलाने खवसावाडीला लवाजमासह पोहोचले. परंतु, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अधिकार्यांची शाळा घेऊन थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना सवाल केला. खवसावाडीच्या रस्त्याचा सात कोटींचा निधी रस्ता न होता कसा गायब झाली की ठेकेदारांनी अधिकार्यांच्या संगनमताने खाल्ला, या प्रश्नावर मात्र अधिकारीवर्गांची बोलती बंद होती.
दरम्यान, संतप्त ग्रामस्थांच्या रोषालाही अधिकार्यांना सामोरे जावे लागले. रस्त्यासाठी देण्यात आलेला निधी गेला कुठे, या प्रश्नावर अधिकार्यांचे पथक निरुत्तर झाले. जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन येत्या काही दिवसांत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन अधिकार्यांच्या पथकाने दिले. परंतु, ही निवडणुकीच्या काळात वेळ मारुन नेण्यासाठी केलेली सारवासारव होती.
घटनास्थळावर चोरपावलांनी अधिकारी पाहोचले तेव्हा त्यांना एक विदारक चित्र पाहावयास मिळाले. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, गटविकास अधिकारी लता मोहिते, कार्यकारी अभियंता राहुल देवांग, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रवी पोचपोर, उपकार्यकारी अभियंता मनिषा शिद यांचा समावेश होता. सदरचा रस्ता हा पंतप्रधान सडक योजनेतून मंजूर झाला असून, सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीला नव्याने कार्यान्वित आदेश देऊन जवळपास 11 महिने उलटून गेलेली आहेत. अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने रस्ता न होता निधीचे अपहरण झाले का?
खवसावाडीसह आजूबाजूच्या वाड्यांवर रस्ता नेण्यासाठी 7 कोटी 60 लाख इतका निधी मंजूर झाला होता. या कामाचा ठेका सिध्दिविनायक कन्स्ट्रक्शनला देण्यात आला होता. नव्याने मुदत देऊन 11 महिने उलटून गेले तरी रस्त्याला साधा एक खडादेखील पडलेला नाही. परंतु, या निधीतील काही रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आली आहे, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी पंतप्रधान सडक योजनेचे अधिकारी सौ. देसाई, तर ज्युनिअर इंजिनिअर राजेंद्र खेडकर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही. यावरुन अशी चर्चा रंगत आहे अधिकारी, ठेकेदार, आणि लोकप्रतिनिधींचे तर संगनमत नाही ना?
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, मानसी पाटील, राजू पाटील यांच्यासह स्थानिक आदिवासी कार्यकर्ते सुनील वाघमारे, काळया कडू, नरेश कडू, रेणूका हिलम यांच्यासह आदिवासी बांधवांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचलाच. या रस्त्यासाठी खर्च करण्यात आलेला निधी कुठे गेला, असा जाबही विचारला. याचे उत्तर त्यांना देता आले नाही. पुढील तीन-चार दिवसांत जिल्हाधिकार्यांबरोबर बैठक घेत ही समस्या मार्गी लावली जाईल, असे आश्वासन यावेळी बास्टेवाड यांनी दिले.
निधीबाबत चौकशी लावू : म्हात्रे
विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची लगीनघाई सुरु असतानादेखील वेळात वेळ काढून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी खवसावाडीतील घटनेचा निषेध करत सदरच्या रस्त्यासाठी मंजूर झालेल्या सात कोटी निधीबाबत आपण चौकशी मागणी करीत आहोत. येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकार्यांशी बोलून नक्की निधीचे अपहरण कोणी केले अथव निधी मंजूर असताना रस्त्याचे काम का सुरु केले नाही, याबाबत योग्य ती माहिती घेऊन चौकशी मागणी करणार असल्याचे अतुल म्हात्रे यांनी सांगितले.