महिलांसाठी आरक्षित झाल्याने भाग्यवान कोण?
। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनाला मागे टाकत एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसने दहा नगरसेवक निवडून आणत तळा नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
नुकत्याच पडलेल्या नगराध्यक्ष आरक्षणाने महिला प्रवर्ग आरक्षण झाल्याने महिलांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तळा नगर पंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेविका निवडून आल्या आहेत. तर, तीन पुरूष नगरसेवक निवडून आले आहेत.
महिला आरक्षणामुळे नगराध्यक्षपदाचे मुख्य दावेदार असलेले चंद्रकांत रोडे यांना आता उपनगराध्यक्ष पदावर समाधान मानावे लागणार आहे. परंतु, नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण असल्याने सात महिला नगरसेविकांमध्ये ही संधी कोणत्या भाग्यवान महिला नगरसेविकेला मिळते, हे पहावे लागणार आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुशिक्षित, राजकीय क्षेत्रातील अनुभव असणारा, प्रशासनाचा अनुभव असलेला व सर्व सामान्य माणसाला न्याय देणारा असावा, ही अपेक्षा मतदारराजा ठेवून आहे.