अनधिकृत भंगार माफियांना अभय कोणाचे?

| उरण | वार्ताहर |
उरण बोरी नाका स्मशानभूमी जवळ वसलेल्या अनधिकृत भंगारमाफियांचा भांडाफोड करूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे या भंगार माफियांना अभय कोणाचे अशी चर्चा जनतेत सुरू आहे. उरणमध्ये आवोजावो घर तुम्हारा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उरण परिसरात परप्रांतीयांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या परप्रांतीयांची कोणतीही नोंद कुठेच नाही. यातील काहीजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून काहीजण तडीपार असल्याचे समजते.

उरणमध्ये काम व व्यवसाय निमित्त अनेक परप्रांतीयांचा वावर सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रविवारी उरण चारफाटा येथे तर मंगळवारी द्रोणागिरी नोडमध्ये भरणारा बाजार, त्यामध्ये परप्रांतीय असतात. तसेच उरण बोरीनाका येथील स्मशानभूमी जवळ असलेल्या ओएनजीसीच्या पाईपलाईनवर बंदी असतानाही या नियमांची पायमल्ली करून सर्रासपणे खुलेआम भंगार विक्रेत्यांचे जाळे विणले आहे. त्यांची कोणतीही नोंदणी नाही. सर्वसामान्य जनतेला अनेक चौकशीचा सामना करावा लागत असताना या परप्रांतीयांचा कोणतीही चौकशी न करता त्यांचा वावर सुरू आहे.

या परप्रांतीयांचा वावर खुलेआम सुरू असतानाही राजकीय पक्ष व त्यांचे नेतेमंडळी याबाबत मूग गिळून गप्प बसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या परप्रांतीयांची नावे येथील मतदार याद्यांमध्ये असल्याने राजकीय नेते मतांसाठी गप्प बसने पसंत करतात. काहींनी तर मतांसाठी व पैशाच्या हव्यासापोटी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या वस्त्या वसविल्या आहेत. या परप्रांतीयांकडून एखादी दुर्घटना झाल्यावरच कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता जनतेकडून व्यक्त केली जात आहे. उरण बोरी नाका स्मशानभूमीजवळ वसलेल्या भंगार माफियांना अभय कोणाचे असा सवालही या निमित्ताने जनतेच्या मानत उभा रहात आहे.

Exit mobile version