अधिकारी वर्गांकडून कानाडोळा
| उरण | वार्ताहर |
उरण नगरपालिका हद्दीतील बोरीनाका येथे भंगार माफियांना अनधिकृतपणे कब्जा करून दहशत निर्माण केली आहे. त्यांनी भंगाराच्या नावाने कोणतीही परवानगी न घेता पक्की आरसीसी बांधकामे करण्याचा सपाटा लावला आहे. सध्याही बोरीनाका येथे आरसीसी बांधकाम खुलेआम सुरू आहे. याबाबत नगरपालिका बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता ते कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगतात.
नगरपालिकेने जर कोणतीही परवानगी दिली नसेल तर सदरचे बांधकाम कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहे. तसेच सदर बाधकामांबद्दल कोणताच राजकीय पक्ष अथवा लोकप्रतिनिधी बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तरी सुरू असलेले आरसीसी बांधकाम अनधिकृत असेल तर जिल्हाधिकारी यांनी त्वरित कारवाई करून या बांधकाम करणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.
या भागातून ओएनजीसीची गॅस पाईपलाईन गेली असतानाही त्यावर भंगार माफियांनी कब्जा केला आहे. मुख्याधिकारी संतोष माळी, बांधकाम विभागाचे झुंबर माने यांच्या समोर नगरपालिका कार्यालयात पत्रकारांनी उरणमधील समस्यांचा पाढा वाचला होता. त्यावेळी तुम्हांला येत्या 15 दिवसांत नक्कीच बदल दिसेल असे आश्वासन मुख्याधिकारी माळी यांनी पत्रकारांना दिले होते. बदल सोडा आता महिना उलटूनही एकही समस्यां मार्गी लागण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यावरून नगरपालिका प्रशासन समस्यां सोडविण्यासाठी कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण करीत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
याचा फायदा सर्वसामान्य ऐवजी बिल्डर लॉबी उठवितांना दिसत आहे. शहरातील भर नाक्यावरील रस्त्यावर जुने बांधकाम तोडून नव्याने इमारत नियमांची पायमल्ली करून उभी रहात आहेत. तसेच बोरी नाका येथील साईमंदिरासमोर खुलेआम सुरू असलेले आरसीसी बांधकाम सुरू आहे. आठ दिवसांत सदर बाधकामांस सुरुवात करून आज मोठे कॉलम उभारून भिंतीही उभ्या केल्या आहेत. यावरून सदर काम किती वेगाने सुरू आहे याचा प्रत्यय या निमित्ताने येत आहे.
कोणतीही परवानगी न घेता अथवा बिल्डर लॉबीकडून नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या बांधकामांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे. याबाबत मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी काहीच सांगितले नाही.