| पाली/ वाघोशी | प्रतिनिधी |
पाली-खोपोली-वाकण महामार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला असला, तरी प्रत्यक्षात हा मार्ग पुन्हा एकदा खड्डेमय झाल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता आता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गोंदाव फाटा, पाली शहर परिसर, पाली फाटा, राबगावकडे जाणारा मार्ग तसेच वाकण परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे नजरेस न पडल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे.
मंगळवारी (दि.4) ऑगस्टच्या रात्री अशाच खड्ड्यांमुळे दोन दुचाकीस्वारांचा एकाच वेळी अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी वाहनांचे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वीही एका चारचाकी वाहनाचा मोठ्या खड्ड्यात धक्का बसून टायर निखळल्याने वाहन रस्त्यातच बंद पडले होते. या पार्र्श्वभूमीवर एमएसआरडीसीने केलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्याची अशी दयनीय अवस्था कशी झाली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी एमएसआरडीसीने तातडीने या मार्गावरील सर्व खड्डे भरून रस्ता सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. आणखी एखादा गंभीर अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.







