| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या विनाशकारी वीज प्रकल्प आणि धरणे यांच्यामुळे आदिवासी समाज बेघर होणार आहे. त्यात टोरंट प्रकल्प होत असलेल्या भागाला देशाच्या इतिहासाचे सुवर्ण पान आहे. त्यामुळे ऑगस्ट क्रांती दिन आणि आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनाचे दिवशी टोरंट प्रकल्प तसेच धरणे या विरुद्ध आवाज उठवला जाणार आहे. पर्यावरण बचाव समिती कडून संकल्प केला जाणार असून, आदिवासी दिनाचे दिवशी पर्यावरण प्रेमी रॅली काढणार आहेत.
9 ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा होत असतो. तर याच दिवशी आदिवासी दिन हा केवळ उत्सव नसून जल, जंगल, जमीन आणि आदिवासी अस्तित्व वाचविण्याचा संकल्प दिन बनवू असा संकल्प केला आहे. कर्जतमध्ये आदिवासी उध्वस्त होणेच्या मार्गावर असून, आदिवासी बहुल तालुका ही ओळख संपुष्टात येणार आहे. आज टोरेंट, कोंढाणा, पोशिर, शिलार प्रकल्पात त्या परिसरातील आदिवासी समाजासमोर त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न उभा आहे. टोरेंट प्रकल्पासाठी सुमारे 600 एकर जंगल उध्वस्त होणार आहे. लाखो झाडे तोडली जाणार. जंगल नष्ट झाले तर त्यावर अवलंबून असलेली आदिवासीची उपजीविका, पारंपरिक हक्क, संस्कृती आणि जीवनपद्धती धोक्यात येणार आहे. कर्जत हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. उद्याही ही ओळख टिकवायची असेल, तर आजच जल, जंगल, जमीन आणि घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी एकजूट होणे आवश्यक आहे.
जंगल गेले तर वनउत्पन्नावरचा आधार संपेल. पिढ्यानपिढ्यांचा उदरनिर्वाह संपेल. डोंगर, नद्या आणि निसर्ग बदलला तर आदिवासींची संस्कृती व ओळख धोक्यात येईल. टोरेंट आदिवासी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात दली जमिनी व घरे प्रकल्पासाठी हडप करणार आहे. कुठलाही प्रकल्प कुठेही सुरु झाला तर कायद्याने त्या कंपनीला सीएसआर फंड खर्च करणे कायद्याने बंधनकारक आहे. ह्या फंडाचे गाजर कंपनी दाखवून आदिवासी संघटना व पुढाऱ्यांना अमिष दाखवेल. यासाठी कंपनी व मधले दलाल यांच्या मध्ये खुप मोठी आर्थिक देवाणघेवाण होणार आहे. परंतु, यातुन आदिवासी कायमचा उध्वस्त होणार आहे याचा भान आपण ठेवणे खूप आवश्यक आहे. पुढच्या पिढीचा विचार करून आदिवासी बांधवांनी टोरेंट प्रकल्पाला विरोध केला पाहिजे.







