| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात मूळ निवासी म्हणून वास्तव्यास आहेत. निरक्षरता, रोजगाराचा अभाव, परिणामी आर्थिक हलाखीची परिस्थिती यामुळे येथील आदिवासी नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असून, ते जंगलातील कंदमुळे, रानभाज्या, मासेमारी या माध्यमातून आपली उपजीविका करीत आहेत.
सध्या पावसाळी रानभाज्यांचे पिक आले असून, पावसाळ्यातील रानभाज्या खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व रुचकर असतात. कंटोलाची भाजी तर आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी अशी आहे. मात्र, माती उत्खननामुळे रानभाज्याच नष्ट झाल्या आहेत. अशी खंत आदिवासी महिलांनी व्यक्त केली. दरम्यान उरण तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, हा विकास नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास करीत आहे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असणाऱ्या आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे साधन धोक्यात आले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून माती चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर अक्षरश: डोंगर पोखरून मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर केले जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा महसूलही बुडत आहे. उरण तालुक्यात वनसंपत्ती बरोबरच डोंगर रांगांनी व्यापलेला परिसर मोठा आहे. विकासाच्या नावे अनेक मोठमोठे प्रकल्प, गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने सर्रास मातीचे उत्खनन होत असल्याने, नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आदिवासींना रोजगारासाठी मिळणारी करवंदे, आंबे, जांभळे, कंदमुळे, शेवळे, कंटोळे यासह विविध प्रकारच्या रानभाज्यांची पावसाळ्यात उगवण या डोंगर भागात अधिक प्रमाणात होत होती. मात्र, येथील डोंगरच भुईसपाट होत आले आहेत. त्यामुळे येथील नैसर्गिक साधन संपत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आली असून, आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे साधन धोक्यात आले आहे.
नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान करणे दंडनीय अपराध असला, तरी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने, दिवसेंदिवस माती उत्खननाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महसूल खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांबरोबर येथील शेतकऱ्यांचे जीवन देखील धोक्यात आले आहे. तसेच या दगड खाणींचा परिसरातील भूजल साठ्यांवर मोठा परिणाम झाला असून, भूजल पातळी जानेवारी फेब्रुवारी मध्येच तळ गाठत आहेत. अशी ही माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली.







