वढाव येथील जिल्हा परिषद शाळेचा पुढाकार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मोबाईलमध्ये रमणारी पिढीला भात लागवडीची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी शाळकरी मुलांना लागवडीचे धडे देण्यात आले. अलिबाग तालुक्यातील वढाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यानी शेतांमध्ये उतरून भात रोपे काढणीपासून भात रोपांच्या लागवडीची कामे शिकण्याचा आनंद लुटला.
रायगड जिल्ह्यामध्ये सध्या भात लावणीची कामे सुरु झाली आहेत. ठिकठिकाणी लावणीची कामे केली जात आहेत. रायगड जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर ज्ञान मिळावे, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. एक दिवस दप्तराविना शाळेपासून अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचा एक भाग म्हणजे अलिबाग तालुक्यातील वढाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भात लावणीचे धडे देण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना शेतात उतरविण्यात आले. त्यांना भात लागवडीचे महत्व पटवून देण्यात आले. त्यानंतर शाळेतील मुलांनी भाताची रोपे काढणीपासून रोपांची लागवड करण्यापर्यंतच्या अनेक कामांचे धडे महिला शेतकऱ्यांकडून घेतले. वढाव शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे आनंद लुटला. यावेळी शेतीचे महत्व समजून घेतले.






