बेवारस गटारांना वाली कोण?

शौकत मुकादम यांचा सवाल

। चिपळूण । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा हायवेलगत सिमेंट काँक्रिटची गटारे बांधण्यात आली आहेत, त्यामध्ये रस्ता खाली आणि गटारांची उंची वर आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटारामध्ये जाणार नाही व ते रस्त्यावरच साठून अपघात होण्याची शक्यता आहे.

बहादुरशेख नाका ते पाग नाका ही हद्द नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये येते. या हद्दीमध्ये हायवेने गटारे बांधली आहेत. ही गटारे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे आतमध्ये कोसळून गटारामध्येच गटाराचा भराव झाला आहे. ही गटारे पावसाळ्यापूर्वी साफ कोणी करायची? नगरपरिषदेने कि हायवेने, ही जबाबदारी वरिष्ठ अधिकार्‍यांनी निश्‍चित करावी. भविष्यात दुर्देवाने अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न माजी सभापती शौकत मुकादम यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले की, आताच्या स्थितीमध्ये पावसाचे पाणी गटारातून जाऊच शकत नाही. संबंधित खात्यांना व अधिकार्‍यांना हे माहिती असूनदेखील त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे का? हे योग्य नाही. गटारावर काही ठिकाणी साफ करण्यासाठी जे कप्पे बसविले आहेत, त्या कप्प्यावर दोन अडीच फुटाचा आर.सी.सी कप्पा उचलण्यासाठी लोखंडी हुक लावले आहेत, त्या हुकामध्ये रस्त्याच्या साइटने चालताना पाय अडकून अपघात होत आहेत.

तसेच, मुंबई-गोवा हायवेची जी गटारे बांधली आहेत, ती कचर्‍याने तुडुंब भरल्यामुळे पावसाचे नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहे. शहराबरोबर परशुराम ते असुर्डे यालगत असणार्‍या गटारांची परिस्थितीही बिकट आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याने याच्यावर तातडीने उपाययोजना करुन मार्ग काढावा व बेवारशी गटारे कोणत्या खात्याकडे आहेत, त्यांनी ती ताबडतोब सफाई करुन घ्यावी, अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली आहे.

Exit mobile version