निधीत रत्नागिरी, राजापूरला झुकते माप
| गुहागर | प्रतिनिधी |
लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत 0 ते 100 हेक्टरपर्यंतच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये प्रत्येक तालुक्यातील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील 9 तालुक्यांना सम प्रमाणात निधीचे वाटप झालेले नसून केवळ रत्नागिरी व राजापूर या ठराविक तालुक्यांसाठीच कोट्यवधींचा निधी खर्च झाला आहे, असा आरोप माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केला आहे. त्यांनी या प्रत्येक कामांवर दि. 31 मार्च अखेर किती निधी खर्च झाला, याबाबत जि.प. रत्नागिरी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून माहिती मिळवली असता, हे वास्तव समोर आले आहे.
0 ते 100 हेक्टरपर्यंतच्या लघुपाटबंधारे योजनेच्या कामांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला या आर्थिक वर्षात 5 कोटी 50 लाख मंजूर झाले आहेत. त्यापैकी 1 कोटी 50 लाखाची बिले द्यावयाचे आहे. दापोली तालुक्यातील 2 कामांसाठी 50 लाख, गुहागर विधानसभा मतदारसंघातील गुहागर तालुक्यासाठी 2 तर चिपळूण तालुक्यासाठी 1 अशा तीन कामांना 86 लाख, चिपळूण विधानसभा मतदारसंघातील संगमेश्वर तालुक्यातील 3 कामांना 50 लाख, रत्नागिरी तालुक्यातील 6 कामांसाठी 2 कोटी 50 लाख, राजापूर मतदारसंघातील लांजा तालुक्यातील 2 व संगमेश्वर तालुक्यातील 3 अशा 5 कामांसाठी 1 कोटी 10 लाख मंजूर करण्यात आले आहेत. एकूणच हा साडेपाच कोटीचा निधी 9 तालुक्यांसाठी असताना रत्नागिरी व राजापूर या दोन तालुक्यांसाठी कोटीची उड्डाणे ठरला आहे. मात्र, उर्वरित तालुक्यांना काही लाख देऊन त्यांची बोळवण केली असल्याचे डॉ. नातू यांचे म्हणणे आहे.
सर्व ठिकाणी पाऊस सारखाच पडतो पण पाणी अडविण्याचे काम फक्त काही भागातच होत आहे. केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी ठराविक तालुक्यांना कोटीचा निधी देण्यात आला असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी.
-डॉ. विनय नातू, माजी आमदार