26 हजार मतदारांच्या बोटावर भवितव्य
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपालिकेच्या सत्तेची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीची रणशिंगे वाजली असून, सोमवार दि. 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उरणच्या गल्लीबोळात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. त्यामुळे उरणच्या 26,214 मतदररांवर नगराध्यक्ष व नगरसेवकांचे भवितव्य ठरणार असून यावेळी कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी उरण नगरपालिकेतील एकूण 10 प्रभागांतून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असे 22 जनप्रतिनिधी निवडून देण्यात येणार आहेत. नगराध्यक्षपद महिला राखीव असल्याने राजकीय पक्षांच्या गणितात उलथापालथ झाली असून, प्रत्येक पक्षाला योग्य महिला उमेदवार शोधण्यासाठी धडपड करावी लागत आहे. उरणमध्ये एकूण 13,311 पुरुष आणि 12,903 महिला असे मिळून 26,214 मतदार असून ते आता उरण नगरपालिकेच्या गादीवर कोणाला बसवायचे, हे ठरवणार आहेत. या निवडणुकीत प्रभागनिहाय मतदारसंख्या पाहिली असता प्रभाग 1 मध्ये पुरुष 1605, महिला 1706, प्रभाग 2 मध्ये पुरुष 1549, महिला 1613, प्रभाग 3 मध्ये पुरुष 1252, महिला 1168, प्रभाग 4 मध्ये पुरुष 1416, महिला 1321, प्रभाग 5 मध्ये पुरुष 1298, महिला 1268, प्रभाग 6 मध्ये पुरुष 1010, महिला 1049, प्रभाग 7 मध्ये पुरुष 1566, महिला 1388, प्रभाग 8 मध्ये पुरुष 955, महिला 893, प्रभाग 9 मध्ये पुरुष 1148, महिला 1145, आणि प्रभाग 10 मध्ये पुरुष 1512, महिला 1352 अशी मतदारांची आकडेवारी आहे. प्रभाग 1 ते 9 मधून प्रत्येकी 2 नगरसेवक, तर प्रभाग 10 मधून 3 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यासोबतच संपूर्ण उरण शहराच्या नेतृत्वासाठी एका नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, निकाल 3 डिसेंबर रोजी घोषित केला जाणार आहे. त्यामुळे केवळ काही आठवड्यांतच उरणच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.
उमेदवारीसाठी कोट्यवधी रुपयांचा गेम
मागील कार्यकाळात महिला नगराध्यक्षापदावर होत्या आणि त्यानंतर तीन-चार वर्षांपासून प्रशासकीय अधिकारी कारभार पाहत आहेत. आता पुन्हा निवडणूक जाहीर झाली असून, नगराध्यक्षापद पुन्हा महिलांसाठीच आरक्षित आहे. त्यामुळे पक्षांचे गणित पुन्हा एकदा गुंतागुंतीचे बनले आहे. सर्व पक्ष आता योग्य महिला चेहरा शोधण्यात गुंतले आहेत. दरम्यान, या उमेदवारीसाठी कोट्यवधी रुपयांचा गेम असल्याची कुजबुज राजकीय पातळीवर सुरू आहे. त्यामुळे प्रामाणिक आणि लोकाभिमुख चेहरा पुढे आणण्याऐवजी पैशाच्या बळावर उमेदवारी मिळविणाऱ्यांना संधी मिळते, अशी चर्चा गल्लीबोळांत रंगली आहे.







