तीन दिवसांत 12 जणांवर हल्ला; गावकर्यांनी गाईला केले जेरबंद
। मुरूड । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यातील एकदरा गावात एका दिवसात पिसाळलेल्या गाईच्या हल्यात पाच जण जखमी झाले. गेले तीन दिवस ही गाय दिसेल त्याच्यावर हल्ला करीत होती. एकूण 12 जणांवर या गाईने हल्ला केला. याबाबत तक्रारी करुनही प्रशासनाने लक्ष न दिल्याने ग्रामस्थांनी जोखीम घेऊन या गाईला शुक्रवारी (दि.25) जेरबंद केले.
एकदरा परिसरात सकाळी 6:30 वाजत मॉर्निग वॉक करुन येताना भंगारवाल्यांच्या परिसरात गाईंचा कळप होता. त्यात एक गाय कुत्रा चावल्याने पिसाळली होती. गेले दोन दिवस ही गाय दिसेल त्याच्यावर हल्ला करून जखमी करत होती. तिसर्या दिवशी मॉर्निग वॉक करुन परतणार्या संतोष रांजणकर यांच्यावर गाईने हल्ला केला. त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळताना पडल्याने ते जखमी झाले. त्यानंतर या गाईने महिलेवर हल्ला केला व तिलाही जखमी केले.
या परिसरात गोमुखकडे जाणार्या रस्त्यावर एका मुलीला, एकदरा पुलावर अशोक शापुरकर यांच्यावरही हल्ला करीत त्यांना जखमी केले. या घटनेचे गांभीर्य जाणून ग्रामस्थांनी पुढाकार घेत या गाईला जेरबंद केले. तसेच गाईला तिचे मालक डोंगरी गावातील उत्तम चाफिलकर यांच्या ताब्यात देण्यात आले.