| महाड | ग्रामीण प्रतिनिधी |
राज्यातील महाड, चिपळूण, पोलादपूर आदी ठिकाणी जुलै महिन्याच्या 21 व 22 रोजीच्या झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले होते. नदी जोड प्रकल्पासह नद्यांची स्वच्छता केल्यास पुराचा धोका कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतवर्षी शासनाने सावित्री नदी पत्रातील गाळ काढण्यास सुरुवात केली होती. मात्र, पावसाळा सुरू होताच ही मोहीम थंड पडली ती आजतोपावत. वास्तविक, महापुरापासून गाव वाचविण्यासाठी दिवाळीनंतर नदीपात्रातील गाळ काढणे क्रमप्राप्त होते. मात्र, ती सुरू न झाल्याने येणार्या पावसाळ्यापूर्वी शासनाने तात्काळ यंत्रसामग्री लावत गाळ काढणे गरजेचे बनले आहे, अन्यथा पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण होत आहे.
महाड व पोलादपुरात मुख्य नदी सावित्री वाहत असली तरी पोलादपूरमधील कामथी, चोळाई, ढवळी, घोडवळी नद्यांचे पाणी सावित्री नदीला मिळत आहे. हीच सावित्री महाड तालुक्यातील काळ, गांधारी नदीला मिळत पुढे मार्गस्थ होत असते. या नद्या नद्यांची पात्र खोल करणे गरजेचे आहे. 2005 मध्ये महाड पोलादपूरमध्ये नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने तसेच नदी पात्रात दरडीसह माती वाहून आल्याने ठिकठिकाणी जुट्टे तयार झाले आहेत. या नदीसह इतर नद्यांची पात्र खोल केल्यास पुराचा धोका कमी होईल, त्याचप्रमाणे नद्यांचे रुंदीकरण केल्यास त्या ठिकाणी बंधारे बांधल्यास सिंचनक्षेत्रात वाढ होईल.