| उरण | वार्ताहर |
बोकडवीरा येथील ललिता ठाकूर या 64 वर्षीय विधवेची हत्या झाली आहे. नवीन वर्षांच्या स्वागताच्या सुरवातीलाच घडलेल्या या हत्येमुळे बोकडवीरा गाव चांगलेच हादरले आहे.
ललिता ठाकूर ही महिला एकटीच राहात होती. पतीच्या निधनानंतर कुणीही नसलेली वृध्दा येथील खासगी शाळेत मोलमजुरी तसेच मालकीच्या तीन खोल्यांपैकी दोन खोल्या भाड्याने देऊन मिळणार्या उत्पन्नातूनच आपली उपजीविका करीत होती. मंगळवारी (दि.3) सकाळी शाळा उघडण्यासाठी शाळेची चावी आणण्यासाठी गेलेल्या कर्मचार्याला ललिताबाई आढळून आल्या नाहीत. घरबंद असल्याने शेजारी व आसपासच्या घरातील लोकांकडूनही ललिताबाई दिसल्या नसल्याने सांगण्यात आले. त्यामुळे शेजार्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली असताना कुलुप बंद खोलीची खिडकी उघडली असताना सदर महिला जमिनीवर निपचित पडलेली दिसली. तिचे हातपायही रस्सीने करकचून बांधलेले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
ललिताबाई यांच्या शेजारचीच खोली मोलमजुरी करणार्या अमोल सर्जेराव शेलार या इसमाला भाड्याने दिली आहे. त्याच खोलीत ललिताबाई यांची हत्या झाली आहे. हत्येनंतर खोलीला बाहेरून कुलूप लावण्यात आले आहे. भाडोत्री अमोल सर्जेराव शेलार घटनेपासूनच फरार झाला आहे. ललिताबाई यांच्याशी भाडोत्र्याबरोबर भांडण झाले होते. या वादातूनच खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट, श्वान पथक दाखल झाले आहे. त्यांच्याकडून तपासणी सुरू आहे. अद्यापही कशामुळे आणि कशी हत्या झाली आहे हे सांगणे कठीण आहे. मात्र शवविच्छेदनानंतरच नेमक्या कारणांची माहिती मिळेल. दरम्यान संशयित फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.