। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील सिडकोने उभारलेल्या उड्डाणपूल मागील अनेक महिन्यांपासून अंधारात असून याकडे सिडकोच्या वीज पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उरणमधील प्रवासी व नागरीकांना या उड्डाणपूलावरून अपघाताचा धोका पत्करत प्रवास करावा लागत आहे. मात्र ही समस्या येथील पुलावर वीज पुरवठा करणारे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी केली जात असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला असल्याचे सिडकोच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
नवी मुंबईतील विकासाचा भाग म्हणून उरणच्या विकासाची जबाबदारी सिडकोकडे आहे. उरण-पनवेल महामार्ग ते नवघर, बोकडवीरा ते नवीन शेवा व बोकडवीरा ते वायू विद्युत केंद्र असे तीन उड्डाणपूल सिडकोने उभारले आहेत. यातील नवघर उड्डाणपूल हा जवळपास वर्षभर तर बोकडवीरा-शेवा उड्डाणपूल दोन महिन्यांपासून तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या बोकडवीरा ते वायू विद्युत केंद्र या उड्डाणपूलावर काही दिवसच दिवे लागले होते. त्यांनतर हा उड्डाणपूलही अंधारात आहे.
उरणमधील अनेक विभागांना जोडणार्या रेल्वेच्या उड्डाणपूलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. यातील बोकडवीरा व नवघर या दोन पुलावरील खड्यामुळे अपघाताची शक्यता आहे. तर बोकडवीरा पुलावर एका कोट गावातील नागरिकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र अशा घटना घडत असतांनाही सिडकोच्या उड्डाणपूलावरील वीज पुरवठा विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.