। श्रीवर्धन/दिघी । प्रतिनिधी ।
माणसाच्या मनातील संशय किती टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडू शकतो, याचा थरार श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे पाहायला मिळाला. केवळ चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्याच पत्नीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दिघी येथे घडली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड तालुक्यातील रहिवासी असलेले किरण परशुराम वाघमारे (25) आणि त्यांची पत्नी अनिता किरण वाघमारे (20) हे दाम्पत्य दिघी येथील जैद जलील अहमद गझली यांच्या आंबा बागेत मजुरीचे काम करत होते. उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब गेल्या काही काळापासून येथे वास्तव्यास होते. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली.
वादाचे पर्यवसान हत्येत
सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. रागाच्या भरात असलेल्या किरणच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबाबत असलेला संशय उफाळून आला. संतापाच्या भरात त्याने बागेत पडलेला एक मोठा दगड उचलून अनिता यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, अनिता रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. आसपासच्या लोकांनी धाव घेतली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
पोलीस प्रशासनाची धाव
घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी आंबा बागायतदाराने दिलेल्या तक्रारीवरून दिघी सागरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती किरण वाघमारे याला बेड्या ठोकल्या आहेत. अवघ्या 20व्या वर्षी अनिता यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, यामागे आणखी काही कारणे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.






