वन्य पशुंची होणार शुश्रुषा

वनविभागाला अत्याधुनिक रुग्णवाहिका

| अलिबाग | प्रमोद जाधव |

वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्ह्यातील वन विभागात दोन रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. जखमी वन्य प्राण्यांवर तातडीने उपचार करण्यासाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग होणार आहे. या रुग्णवाहिका सर्व सोयी सुविधांयुक्त असल्याने त्याचा फायदा जखमी रुग्णांना होणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात वनसंपदा प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील जंगलात हिंस्त्र अथवा अन्य वन्य प्राण्यांचा वावर वाढू लागला आहे. वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी व त्यांच्या संवर्धनसाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. वनविभागाच्या खारफुटी व सागरी जैव विविधता प्रतिष्ठानच्या सहकार्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या माध्यमातून सागरी जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक वन्यजीव रुग्णवाहिका पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाली असून अलिबाग व रोहा विभागात प्रत्येकी दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांमुळे जखमी वन्यप्राण्यांचे जीव वाचवण्यात मदत होणार आहे.

रायगड जिल्ह्यात अलिबाग व रोहा असे दोन उपवन संरक्षक यांचे कार्यालय आहेत. या दोन विभागामार्फत जिल्ह्यातील वन्य प्राण्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो. नव्याने जिल्ह्यात दाखल होणाऱ्या या रुग्णवाहिकांतून जखमी वन्य प्राण्यांवर प्राथमिक उपचार केला जाणार आहे. प्राण्यांच्या संरक्षण व सुरक्षेसाठी दोन पिंजरे, एक सायरन, मगर, साप पकडण्यासाठी वेगवेगळी आधुनिक उपकरणे, दोरखंडे अशा वेगवेगळ्या प्रकारची साधने आहेत.

वन्य प्राण्यांवर तातडीने प्राथमिक उपचार व्हावेत. त्यासाठी रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये औषधोपचार कीट असून दोन पिंजरे, दोरखंड अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. या रुग्णवाहिकांचा उपयोग जखमी वन्य प्राण्याचा जीव वाचविण्यासाठी होईल.

नरेंद्र पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, अलिबाग

Exit mobile version