| कासा | प्रतिनिधी |
डहाणू तालुक्यातील उर्से आंबिस्ते गावातील लोहारपाडा भागात रानडुक्कराने अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या हल्ल्यात लहानगा गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. अद्वित जगदीश पराड (5) हा सकाळी सुमारे नऊच्या सुमारास आपल्या आजीसोबत घराजवळील अंगणात खेळत होता. तेवढ्यात अचानक एक रानटी डुक्कर घराजवळ आले आणि अद्वितवर झडप घालत त्याला धडक देत पळून गेले. या हल्ल्यात अद्वितच्या उजव्या हाताला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या. सुदैवाने प्राणहानी टळली. अद्वितला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर लोहारपाडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात रानडुक्कर, ससे, बिबटे यांचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिक अस्वस्थ आहेत. ग्रामस्थांनी वनविभागाकडे सुरक्षा उपाययोजना आणि जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
रानडुक्कराचा लहानग्यावर हल्ला

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606