| चिरनेर | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सव 2025- 26 चे आयोजन शनिवारी (दि.9) मुलुंड हायस्कूल मुलुंड-मुंबई येथे करण्यात आले होते. या रानभाजी महोत्सवाला मुलुंडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रानभाजी महोत्सवात मुलुंडकरांना कोकणातील रानभाज्यांची ओळख करुन दिली. या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन ठाणे कोकण विभागीय कृषी सहसंचालक बाळाजी ताटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खा. मनोज कोटक, प्रकाश गंगाधरे, नंदकुमार वैती, संजय घुडे, उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर, कृषी सहाय्यक अधिकारी सुषमा गायकवाड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
नैसर्गिक रान भाज्यांमध्ये खते कीटकनाशकांचा वापर होत नसल्यामुळे त्या प्रदूषणमुक्त असतात. नव तरुणांना या भाज्यांची माहिती व्हावी, काळानुरूप त्या नष्ट होऊ नये, यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार होणे ही आवश्यक आहे.
बाळाजी ताटे
ठाणे कोकण विभागीय कृषी सहसंचालक
रानभाज्या या पावसाळ्यातच मिळत असल्याने आणि आरोग्यवर्धक असल्याने या भाज्यांचे खवय्यांना देखील वेध लागलेले असतात. पावसाळी हंगामात मिळणाऱ्या दुर्मिळ रानभाज्या या स्वस्त मिळत असल्याने, या रानभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी असते.
सुषमा गायकवाड
सहाय्यक कृषी अधिकारी उरण
