श्रावणातील रानभाज्या पनवेलकरांच्या भेटीला

आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन
प्रीतम म्हात्रेंच्या पुढाकाराने महोत्सवाचे आयोजन

पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची जेएम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते स्वर्गीय भगवानदादा पालव यांची नात सुनेत्रा अरुण पालव यांच्या ट्रायबल ग्रीन्स यांच्या संयुक्त रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी मुलींनी बनविलेल्या भाज्यांचा आस्वाद घेतला. पनवेलकरांनी या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या महोत्सवाला माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जून महिन्यानंतर पावसाळ्यात दुर्गम डोंगराळ भागात फक्त दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीसाठी या रानभाज्या येतात ज्या पुढे वर्षभर आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु या रानभाज्यांचे आपल्या शरीराच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप महत्त्व असते या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात विविध आवश्यक असलेले क्षार मिळतात, त्यांची कमी या दोन महिन्यांत भरून निघते, असे ट्रायबल ग्रीन्स संस्थेच्या सुनेत्रा पालव यांनी सांगितले.
दरम्यान, प्रीतम म्हात्रे म्हणाले, श्रावण महिन्यात येणार्‍या विविध प्रकारच्या रानभाज्या गोळा करून आपले आदिवासी बांधव शहरांमध्ये विक्रीसाठी येतात, परंतु त्या भाजीविषयी जनजागृती नसल्यामुळे शहरातील नागरिक या भाज्या सहजासहजी विकत घेत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन मी याबाबतीत पुढाकार घेऊन या रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्याचा मानस ठेवून रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. जेणेकरून माझ्या आदिवासी बांधवांना त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या रानभाज्यांची प्रदर्शन आणि विक्रीसाठी एक ग्राहक पेठ निर्माण होईल हा यामागचा उद्देश आहे. शहरीकरणाच्या माध्यमातून माझ्या ग्रामीण भागातील बांधवांना अशा प्रकारच्या उपक्रमातून रोजगाराची संधी निर्माण होईल.

Exit mobile version