| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील माणगाव टेकडीचा खासगी जमिनी वरील भागातील जंगल (दि. 26) रात्री लागलेल्या वणव्यात भस्मसात झाले. मात्र वन विभागाने जोरदार प्रयत्न करीत जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
मौजे माणगाव कडील राखीव वन कक्ष क्र 50 अ ला लागून असलेल्या मालकी क्षेत्रात आग लागली होती. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे वन कर्मचारी सतर्क होते, मात्र त्या भागापासून वन क्षेत्र लांब असल्याने वन विभाग निर्धास्त होता. मात्र रात्री आठ वाजले तरी वन जमिनीवरील आग विझत नव्हती, शेवटी नेरळ वन विभागाचे वन कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन जमिनी जवळ आग येऊन पोहचणार असल्याने वन विभागाने सगुणा वन संवर्धन समितीचे कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यावेळी लागलेली आग राखीव वनाला लागून सगुणा तंत्रज्ञान कडून जाळ रेषा जंगली झाडे तसेच वन विभागाच्या फायर लाईन मुळे वणवा राखीव वनात येण्यापासून रोखण्यास मदत झाली. तब्बल 5-6 तासांच्या अथक परिश्रमानंतर रात्री 10.30 च्या सुमारास पूर्ण वणवा विझवण्यात यश आले. रात्री वन विभाग तसेच स्थानिक आणि सगुणा वनसंवर्धन समितीचे कार्यकर्ते फिरत होते.
त्यावेळी वनरक्षक भूषण साळुंखे, वन कर्मचारी ज्ञानेश्वर माळी, विठू दरवडा, धोंडू बांगारे, जानू शिंगाडे, काळूराम जामघरे, सुरेश ढुमणे, श्याम पेमारे, सचिन मेंगाळ तसेच सगुणा वनसंवर्धन समितीचे अनिल निवळकर, परशुराम आगीवले, भगवान शिंगवा तसेच काही गावकरी यांनी आधी खासगी जमिनीवर लागलेली आणि नंतर वन जमिनी जवळ जावून पोहचलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.







