गंजलेले वीजखांब जीवावर बेतणार?

महावितरणच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थ संतप्त

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

बेणसे येथील सिद्धार्थ नगर परिसरात उभे असलेले विद्युत खांब सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, प्रवेशद्वारा जवळील व समीर अडसुळे यांच्या घराजवळील खांब गंजून पूर्णपणे जर्जर झालेला आहे. या पोलमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या विद्युत खांबांचा तळभाग पूर्णपणे पोखरला गेला असून, काही खांब एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी हा पोल कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेक वेळा महावितरण विभागाकडे तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. “अपघात झाल्यानंतरच प्रशासन खडबडून जागे होणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. बेणसे मोहल्ला येथील आशिफ मोमीन यांच्या घराजवळील पोल देखील धोकादायक स्थितीत आहे. त्याकडे ही दुर्लक्ष केले जातं आहे.

सिद्धार्थ नगर परिसरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मोठ्या प्रमाणात वावरत असतात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गंजलेल्या खांबांची स्थिती अधिकच धोकादायक बनली असून, जोरदार वारा किंवा पावसामुळे पोल कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विजेच्या तारा तुटून विद्युत प्रवाहाचा धोका निर्माण झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

ग्रामस्थांनी आरोप केला की, विजवीतरण विभागाकडून या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा प्रशासनाला कागदी कारभार महत्त्वाचा वाटत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. “एखाद्याचा जीव गेल्यानंतरच अधिकारी जबाबदारी स्वीकारणार का?” असा संतप्त प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी तातडीने नवीन पोल बसवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, परिसरातील धोकादायक वीजखांबांचे तात्काळ सर्वेक्षण करून जर्जर पोल बदलण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Exit mobile version