क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दुखापत व उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणातील बंदी यामुळे प्रदीर्घकाळ जिम्नॅस्टिक्सपासून दूर असलेली दीपा कर्माकर चीनमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने ठरवून दिलेल्या निवड निकषांमध्ये बसत नसतानाही दीपाची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड करा, अशी विनंती भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटनेकडून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
दीपा हिने 2016 रिओ ऑलिंपिकमध्ये जिम्नॅस्टिक्स या खेळात चौथा क्रमांक पटकावताना संस्मरणीय कामगिरी केली. त्यानंतर दुखापती व बंदी या कारणांमुळे दीपा स्पर्धांपासून दूर होती. टोकियो ऑलिंपिकलाही ती मुकली. डोपिंग चाचणीत दोषी सापडल्यामुळे तिच्यावर 21 महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेचा कालावधी या वर्षी 10 जुलैला पूर्ण झाला. भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटनेकडून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चाचणीसाठी दीपाचीही निवडही करण्यात आली. भुवनेश्वर येथे 11 व 12 जुलै रोजी झालेल्या या चाचणीत दीपाने अव्वल दर्जाची कामगिरी केली.
दरम्यान, दीपा कर्माकर व भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटना यांच्याकडून नियमात थोडी शिथिलता देण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. यावर सूत्रांकडून सांगण्यात आले की, दीपा व भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटना यांच्याकडून आम्हाला लेखी विनंती करण्यात आली आहे. दीपाला संधी देण्यात येईल. तिची निवड होण्याची अधिक शक्यता आहे, असेही सांगण्यात आले.