| माथेरान | वार्ताहर |
रायगडचे माजी जिल्हाधिकारी व शेकाप चे कंधार लोहा येथील विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सोमवारी माथेरानला भेट दिली व येथील रोप-वे व्यवस्था व मालवाहतूक व्यवस्था यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये 2002 ते 2005 या काळामध्ये रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिलेले श्यामसुंदर शिंदेच्या कार्यकाळात माथेरानला विशेष प्राधान्य देताना येथील अनेक समस्या सोडविल्या होत्या, ते माथेरानमध्ये आपल्या कुटुंबासोबत आले होते. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले असले तरी ते सध्या शेतकरी कामगार पक्षाचे एकमेव आमदार म्हणून नांदेड येथील कंधार लोहा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या कार्यकाळात माथेरानमधील समस्यांची त्यांना जाण होती व आताही येथील वाहतूक व मालवाहतूक व्यवस्था तशीच असल्याने त्या सोडविण्यासाठी माथेरानकरांना पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन दिले. तर, माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी माथेरानच्या रोप-वे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना निवेदन दिले. यावेळी माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी व गटनेते प्रसाद सावंत उपस्थित होते.